माध्यम : माध्यम विश्वातील ध्रुवतारा

माध्यम : माध्यम विश्वातील ध्रुवतारा
Published on
Updated on

अलीकडेच रुपर्ट मर्डोक यांनी फॉक्स कॉर्पोरेशन आणि 'फॉक्स न्यूज'च्या अध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचे जाहीर केले. एका छोट्या संस्थेचे संचालक म्हणून आपला प्रवास सुरू करणारे मर्डोक 2020 पर्यंत सुमारे 50 देशांमध्ये 800 पेक्षा जास्त कंपन्यांचे मालक होते. त्यांचा हा अफाट विस्तारलेला आणि उंचावलेला आलेख जगाला अचंबित करणारा राहिला. मर्डोक यांच्या आजवरच्या प्रवासात वादग्रस्त टप्पे अनेकदा आले. मर्डोक यांनी माध्यम विश्वाचे पारंपरिक आयाम बदलण्यामध्ये मोठी भूमिका बजावली.

जागतिक माध्यम विश्वातले एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि माध्यमसम्राट म्हणून रुपर्ट मर्डोक यांचे नाव अनेक वर्षांपासून ध्रुवतार्‍यासारखे अढळ राहिले आहे. फॉक्स कॉर्पोरेशनचे दीर्घकाळ सहअध्यक्ष आणि 'द वॉल स्ट्रीट जर्नल', 'हार्परकॉलिन्स' आणि 'न्यूयॉर्क पोस्ट'ची मूळ कंपनी न्यूज कॉर्पचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांची कारकिर्द जगाने पाहिली आहे. माध्यम क्षेत्रात सात दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत बातम्या आणि मनोरंजन विश्वात स्वत:चे साम्राज्य निर्माण करणारे मर्डोक यांनी अखेर थांबण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच मर्डोक यांनी फॉक्स कॉर्पोरेशन आणि 'फॉक्स न्यूज'च्या अध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचे जाहीर केले.

'द वॉल स्ट्रीट जर्नल'ने यासंदर्भातील माहिती दिली आहे. 'माझ्या संपूर्ण प्रोफेशनल जीवनात मी दररोज बातम्या आणि संकल्पनांमध्ये गुंतलेला होतो आणि यापुढेही ते कायम राहणार आहे.' असे मर्डोक यांनी हा निर्णय घेताना आपल्या कर्मचार्‍यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे. मर्डोक यांच्या या राजीनाम्याची जगभरात मोठी चर्चा झाली. याचे कारण माध्यम विश्वातील त्यांची हुकुमत. 2015 मध्ये आपल्या व्यावसायिक साम्राज्याची धुरा आपल्या दोन मुलांकडे सोपवण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला होता. तथापि, मर्डोक यांचे पुत्र साम्राज्याची धुरा कशी वाहतील, याबाबतची थोडी काळजी भागधारकांत असल्याने त्यावेळी या कंपनीच्या समभागात जोरदार घसरण झाली होती.

ऑस्ट्रेलियाचे रहिवासी असलेल्या मर्डोक यांच्यावर 1952 मध्ये वडिलांच्या निधनानंतर 'न्यूज ऑफ अ‍ॅडलेड' हे दक्षिण ऑस्ट्रेलियातील सुमारे 75 हजार खप असणारे वृत्तपत्र सांभाळण्याची जबाबदारी आली. या एका छोट्या संस्थेचे संचालक म्हणून आपला प्रवास सुरू करणारे मर्डोक 2020 पर्यंत सुमारे 50 देशांमध्ये 800 पेक्षा जास्त कंपन्यांचे मालक होते. त्यांचा हा अफाट विस्तारलेला आणि उंचावलेला आलेख जगाला अचंबित करणारा राहिला. 1960 च्या दशकात मर्डोक यांनी ऑस्ट्रेलियातील अनेक स्थानिक वर्तमानपत्रे विकत घेतली. त्यामध्ये पर्थमधील 'द संडे टाइम्स' आणि सिडनीमधील 'द डेली मिरर' यांचा समावेश होता. 1964 मध्ये त्यांनी 'द ऑस्ट्रेलियन' या राष्ट्रीय वृत्तपत्राची स्थापना केली. पुढे 'द न्यूज ऑफ द वर्ल्ड' आणि 'द सन' विकत घेऊन मर्डोक यांनी ब्रिटिश मीडिया मार्केटमध्ये पाऊल ठेवले.

1985 मध्ये त्यांनी ट्वेंटीएथ सेंच्युरी फॉक्स ऑईलमॅन मार्विन डेव्हिसकडून 600 दशलक्ष डॉलर्सना विकत घेतली आणि हॉलीवूडमध्ये आपला व्यवसाय स्थापित केला. पुढच्याच वर्षी मर्डोक यांनी टीव्ही क्षेत्रात प्रवेश केला. 1996 मध्ये त्यांनी 'फॉक्स न्यूज'ची स्थापना केली. 'ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स'च्या एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार, 92 वर्षीय रुपर्ट मर्डोक यांची एकूण संपत्ती आठ अब्ज डॉलर्स आहे. मर्डोक यांची फॉक्समध्ये सध्या 3.2 अब्ज डॉलर्सची हिस्सेदारी आहे, तर न्यूज कॉर्पमध्ये त्यांची 1.3 अब्ज डॉलरची हिस्सेदारी आहे. त्यांच्याकडे फॉक्स कॉर्पचे 142 दशलक्ष डॉलर्सचे शेअर्सदेखील आहेत. 'द वॉल स्ट्रीट जर्नल'देखील मर्डोक यांच्या 'न्यूज कॉर्प'च्या मालकीची आहे. त्याशिवाय मर्डोक यांच्याकडे रोख, रिअल इस्टेट, नौका आणि कारच्या रूपात 3.2 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.

मर्डोक हे माध्यमसम्राट म्हणून ओळखले जात असले, तरी आपल्या दिलखुलास जीवनशैलीमुळे अनेकदा ते जगभरातील माध्यमांच्या प्रमुख मथळ्यांमध्ये झळकताना दिसतात. 2016 मध्ये मर्डोक यांनी त्यांच्यापेक्षा 25 वर्षांनी लहान आणि चार मुलांची आई असलेल्या जेरी हॉल हिच्याशी लग्नगाठ बांधण्याचा निर्णय असाच जगाचे लक्ष वेधून गेला. मर्डोक यांनी स्वतःच्याच 'द टाइम्स' या वृत्तपत्रातून जेरीसोबतच्या त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली होती आणि लवकरच आम्ही लग्न करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. एखाद्या तरुणाप्रमाणे त्यांनी मागील चार महिन्यांपासून आम्ही डेटिंग करत होतो आणि आता एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे म्हटले होते. विशेष म्हणजे तो त्यांचा चौथा विवाह होता. त्यानी पहिल्यांदा एका फ्लाईट अटेंडंटशी लग्न केले होते. हे लग्न 11 वर्षे टिकले आणि 1967 मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी दोनदा विवाह केला. तिसरा संसार मोडल्यानंतर जेरी आणि 10 मुलांच्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी बोहल्यावर चढले. जगात नावलौकिक असलेला फायनान्शिअल टाइम्स समूह 1.2 अब्ज डॉलर इतक्या किमतीला विकत घेण्याचा प्रयत्नही मर्डोक यांनी करून पाहिला. पण त्यात त्यांना यश आले नाही.

रुपर्ट मर्डोक यांनी माध्यम विश्वाचे पारंपरिक आयाम बदलण्यामध्ये मोठी भूमिका बजावली. 1980 च्या काळात मर्डोक यांनी जगातील माध्यम व्यवस्थेतील दीडशेच्या आसपास संस्थांवर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले होते. हे करत असताना त्याने अमेरिका-युरोपमधील सर्व महत्त्वाच्या माध्यम संस्थांमधील बातम्या किंवा कथा सांगण्याची शैलीच बदलून टाकली होती. तसेच या संस्थांमधील प्रस्थापित नैतिक, व्यापारी व व्यवस्थापकीय मूल्यांची बैठक बदलून टाकली. गेल्या काही वर्षांत लोकप्रिय झालेले 'पेज थ्री' कल्चर माध्यम विश्वात सर्वप्रथम आणले ते मर्डोक यांनी. 'द सन' या त्यांच्या वृत्तपत्रात उत्तान आणि टॉपलेस महिलांचे प्रसिद्ध होणारे फोटो सनसनाटी ठरत असत. परंतु 2015 मध्ये या नियतकालिकाने 'पेज थ्री'ला मूठमाती देण्याचा निर्णय घेतला.

रुपर्ट मर्डोक यांनी 1969 साली 'न्यूज ऑफ द वर्ल्ड' हे वृत्तपत्र विकत घेतले आणि सनसनाटी, मसालेवाईक बातम्या देऊन त्यांनी या पेपरचा खप प्रचंड वाढवला. त्यांनी शेकडो गुप्तहेरांना नोकरीवर ठेवून घेतले होते आणि त्या माध्यमातून अनेक नेत्यांच्या, अभिनेत्यांच्या आणि राजघराण्यातल्या मंडळींच्या खासगी आयुष्यावर 24 तास नजर ठेवण्यास सुरुवात केली होती. 2011 मध्ये 'न्यूज ऑफ द वर्ल्ड' टॅब्लॉईडने सनसनाटी बातम्यांसाठी अनैतिकपपणे फोन हॅक केल्याचे प्रकरण उघड झाल्यानंतर ब्रिटनमध्ये खळबळ माजली होती. याप्रकरणी ब्रिटनच्या संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी करणार्‍या हाऊस ऑफ कॉमन्सच्या कल्चर, मीडिया आणि स्पोर्टस् कमिटीसमोर उपस्थित राहिल्यानंतर मर्डोक पिता-पुत्रांनी फोन हॅकिंग प्रकरणाचा फटका बसलेल्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागितली.

या प्रकरणात दोन वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना राजीनामा द्यावा लागला होता. या टॅब्लॉईडचे माजी संपादक अँडी कोल्सन यांना आपल्या जनसंपर्क विभागाचे प्रमुख नेमल्याप्रकरणी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्यावरही दबाव आला होता. या प्रकरणानंतर मर्डोक यांच्या मालकीच्या वृत्तपत्रांची विश्वासार्हता ब्रिटनमध्ये झपाट्याने घसरणीला लागली. या प्रकरणानंतर मर्डोक यांनी ब्रिटन आणि भारतातील आपल्या वृत्तकंपन्यांच्या संचालकपदाचा राजीनामा देऊन आपल्या साम्राज्याच्या वाटणीची सुरुवात केली होती.

मर्डोक यांच्या आजवरच्या प्रवासात असे वादग्रस्त टप्पे अनेकदा आले. अलीकडच्या काळात माध्यम विश्वात डिजिटलायझेशनचा प्रभाव वाढत गेला. मुद्रित माध्यमांच्याबरोबरीने इंटरनेटवर बातम्या वाचणार्‍यांची संख्या वाढत गेली. हा ट्रेंड विकसित करण्यात आणि पुढे नेण्यात गुगलसारख्या सर्च इंजिनने मोठी भूमिका बजावली. ती बजावत असताना गुगलने या माध्यमातून भरभक्कम कमाईचे अर्थगणित जोपासले. वास्तविक, गुगल स्वतः कोणतीही बातमी तयार करत नाही की, त्याचे स्वतःचे पत्रकारही नाहीत. परंतु विविध संकेतस्थळांवर पोस्ट केल्या जाणार्‍या बातम्यांचे संकलन करून गुगल न्यूजच्या माध्यमातून त्या युजर्सना दाखविण्याचे काम गुगल करते. थोडक्यात, गुगल हा केवळ वाटाड्या आहे; पण हा वाटाड्या इतरांपेक्षा भरभक्कम कमाई करू लागला आहे. ही बाब लक्षात येताच, मर्डोक यांच्यासारख्या चाणाक्ष माध्यम सम्राटाने गुगलशी 'न्यूज शेअरिंग'बाबत करारच केला. त्यानंतर फेसबुकनेही रुपर्ट मर्डोक यांच्या 'न्यूज कॉर्प'सोबत करार केला. टेक कंपन्यांना ते वापरत असलेल्या बातम्यांसाठी वृत्तसंस्थांना पैसे देण्याबद्दलचा वादग्रस्त कायदा ऑस्ट्रेलियात मंजूर करण्यात आला होता. त्या आधारावर हा करार करण्यात आला.

'न्यूज कॉर्प'च्या मालकीच्या ऑस्ट्रेलियातल्या प्रकाशनांच्या मजकुरासाठी हा तीन वर्षांचा करार करण्यात आला. मर्डोक यांची संपत्ती आणि प्रभाव कितीही असला तरी गुगल, फेसबुक यांच्यासारख्या आजच्या काळातील विश्वसम्राटांना शह देणे ही बाब सोपी नव्हती; पण मर्डोक यांनी याबाबत कणखर भूमिका घेत, 'आमची एकही बातमी गुगल न्यूजवर दिसणार नाही', असे स्पष्ट केले. कोणतेही वृत्तपत्र किंवा वृत्तसंस्था एखादी बातमी किंवा वृत्तांत देते, तेव्हा त्यामागे बर्‍याच गोष्टी एकत्रित आलेल्या असतात. एकतर, या बातम्यांसाठी प्रशिक्षित व तज्ज्ञ मंडळी काम करीत असतात.

वृत्तपत्रे या सार्‍या कामांसाठी मोठी गुंतवणूकही करीत असतात. यामागचा एक प्रमुख उद्देश असतो, तो म्हणजे वाचकांना जास्तीत जास्त विश्वासार्ह, सत्य आणि अनेकदा पडताळून पाहिलेली माहिती देणे. अशी सगळी संस्कारित, परिष्कृत माहिती गुगल किंवा फेसबुक यांना सहज मिळते आणि ती ते प्रसारित करतात. असे करताना त्यांना काहीही कष्ट पडत नाहीत. तरीही जाहिरातींचे सारे उत्पन्न आपल्या खिशात आणि आपल्या प्लॅटफॉर्मवर परंपरागत मीडियातील बातम्यांचा मात्र पुरेपूर वापर, असे विपरीत चित्र जगभर निर्माण झाले आहे. हे चित्र बदलण्याच्या द़ृष्टीने मर्डोक यांनी सर्वात पहिले पाऊल टाकले. त्यातून जगाला या सर्व एकंदर अर्थकारणाविषयी जाग आली. आज वयाच्या 92 व्या वर्षीही मर्डोक यांचा जागतिक माध्यमासंदर्भातला आणि वाचकांच्या-नागरिकांच्या बदलत्या अभिरुचीसंदर्भातला व्यासंग दांडगा आहे. तथापि, सात दशकांनंतर त्यांनी 'फॉक्स' आणि 'न्यूज कॉर्प'पासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात, कार्यकारी अध्यक्ष म्हणून ते कायम राहणार आहेत. पण अध्यक्षपदी मर्डोक यांचा मुलगा लाचलान काम पाहणार आहे. तो सध्या फॉक्स कॉर्पचा सीईओ म्हणून कार्यरत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news