मनोरंजन : स्मरण सुवर्णयुगाचे

मनोरंजन : स्मरण सुवर्णयुगाचे
Published on
Updated on

एक काळ असा होता की, भारताला फुटबॉलमध्ये 'ब्राझील ऑफ एशिया' असं म्हटलं जायचं. 1951 आणि 1962 मध्ये आशियाई खेळातील सुवर्णपदकं, मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये सेमीफायनलपर्यंत मारलेली धडक आणि जिंकलेला कोलंबो चषक… भारतीय फुटबॉलचा हा सुवर्णकाळ होता. हे सोन्याचे दिवस दाखवणार्‍या जादूगाराचं नाव होतं, सय्यद अब्दुल रहीम म्हणजेच 'रहीम साब.' आजघडीला विस्मृतीत गेलेल्या या रहीम साब यांच्यावर 'मैदान' नावाचा सिनेमा येतोय…

ही गोष्ट आहे 1964 ची. भारतीय फुटबॉलचे तेव्हाचे प्रशिक्षक अल्बर्टो फर्नांडो ब्राझीलमध्ये एका स्पोर्टस् कॅम्पला गेले होते. तिथून आल्यावर त्यांनी उद्गारलेले एक वाक्य फार महत्त्वाचे आहे. ते म्हणतात, 1956 मध्ये रहीम साबनी आम्हाला जे शिकवलं, तेच आज ब्राझीलमध्ये शिकवलं जातंय. कारण, तोपर्यंत जगभर फुटबॉलमध्ये 2-3-5 या फॉर्मेशनमधील खेळ लोकप्रिय होता; पण रहीम यांनी भारतात जे 4-2-2 हे फॉर्मेशन रुजवलं, तेच पुढं ब्राझीलनं 1958 आणि 1962 च्या वर्ल्डकपमध्ये लोकप्रिय केलं.

रहीम हे 1950 ते 1963 म्हणजे त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत ते भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक होते. 11 जून 1963 रोजी कर्करोगामुळे त्यांचं निधन झालं. शेवटपर्यंत त्यांचं ध्येय हे फक्त आणि फक्त फुटबॉल हेच होतं. कर्करोगाचं निदान झालं असतानाही, रहीम यांनी मैदान सोडलं नाही. याचा एक हृदयद्रावक किस्सा सांगितला जातो.

1962 मध्ये भारतानं जकार्ता येथे झालेल्या आशियाई खेळामध्ये रहीम यांच्या मार्गदर्शनाखाली भारत अंतिम सामन्यात पोहोचला. दक्षिण कोरियाविरुद्ध हा अंतिम सामना होणार होता.

10 वर्षांनंतर भारताला सुवर्णपदक मिळवण्याची ही संधी होती. त्याहूनही हे यश आणखी एका कारणासाठी महत्त्वाचं होतं. कारण, तोपर्यंत रहीम यांच्या कर्करोगाचं निदान झालेलं होतं. डॉक्टरांनी रहीम यांच्याबद्दल असं सांगितलं होतं की, त्यांच्या आयुष्याचे फक्त काही महिनेच शिल्लक आहेत; पण तरीही रहीम यांनी जिद्द सोडली नव्हती. त्यांनी टीमला सांगितलं की, 'कल आप लोगों से मुझे एक तोहफा चाहिये… कल आप सोना जितलो.' भारतीय टीमनं या अंतिम सामन्यात सगळा जीव ओतला आणि दक्षिण कोरियाचा 2-1 नं पराभव केला. रहीम यांच्यासाठी टीम इंडियानं सुवर्णपदक जिंकून, जकार्तामध्ये तिरंगा फडकावला.

रहीम साब घडले तरी कसे?

रहीम यांचा जन्म ब्रिटिश भारतातील हैदराबादचा. 17 ऑगस्ट 1909 रोजी जन्मलेल्या रहीम यांनी सुरुवातीला शाळेत शिक्षक म्हणून काम केले; पण फुटबॉल हा त्यांचा प्राण होता. उस्मानिया विद्यापीठासाठी ते फुटबॉल खेळत होते. इलेव्हन हंटर्स नावाच्या क्लबसाठीही ते खेळत होते. त्या काळातच त्यांचा खेळ लक्षवेधी ठरला होता. कॉलेजमध्ये असतानाच ते खेळाडू म्हणून लोकप्रिय होऊ लागले होते. शिक्षक म्हणून काम करत असतानाच, त्यांनी शारीरिक शिक्षणाचा डिप्लोमा घेतला आणि क्रीडा उपक्रमांची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. या घटनेने त्यांच्यातील क्रीडा प्रशिक्षक जगासमोर आला. व्यावसायिक फुटबॉलपटू म्हणूनही ते कमर क्लबकडून खेळले होते. त्यामुळे त्यांच्यातल्या प्रशिक्षकाला खेळातील अनेक खाचाखोचा माहिती होत्या. त्यातूनच त्यांनी नवनव्या स्ट्रॅटेजीज बांधायला सुरुवात केली.

हैदराबादेत अन्य फुटबॉल संघटनांमध्ये रहीम यांच्याबद्दल चर्चा होऊ लागली. तिथून त्यांना निमंत्रणे येऊ लागली. 1939 मध्ये स्थापन झालेल्या हैदराबाद फुटबॉल असोसिएशनचे ते संस्थापक सदस्य होते. पुढे या संघटनेकडून देशभर विविध उपक्रमांत भाग घेताना, रहीम यांच्यातील प्रशिक्षकाची नजर देशभरातील नवनवे खेळाडू शोधत राहिली. देशाच्या गल्ली-गल्लींतून त्यांनी खेळाडू शोधले आणि मग ते देशासाठीही खेळले; पण त्यांना शोधण्यात आणि घडवण्यात रहीम यांचा मोठा वाटा होता.

एक फुटबॉल आणि एक कप चहा

हैदराबादमध्ये फुटबॉलचा नवा इतिहास लिहिला जात होता. 15 हजार फुटबॉलपटू आणि 40 रेफरी यांची संघटना उभारली जात होती. त्यातून नवनवे प्रयोग मैदानावर होत होते. 1950 मध्ये रहीम हे हैदराबाद सिटी पोलिस क्लबचे प्रशिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांच्या कारकिर्दीत 1950 ते 1955 या काळात संघानं सलग पाच रोव्हर्स कप जिंकले. तीनवेळा ड्युरंड कप जिंकला. त्यांच्या या संघात खेळणारा महान खेळाडू मोहम्मद नूर एकदा असं म्हणाला होता की, 'आम्ही जेव्हा सराव करायचो तेव्हा आमच्याकडे फक्त एक फुटबॉल होता आणि नाश्त्यासाठी मिळायचा फक्त एक कप चहा; पण रहीम साब यांनी आम्हाला ती प्रेरणा दिली होती की, त्यांच्यासाठी आम्ही काहीही करायला तयार असायचो. आज आम्ही जे काही आहोत ते त्यांनी दिलेल्या प्रशिक्षणामुळेच!'

संतोष ट्रॉफीसाठीही रहीम यांनी हैदराबाद फुटबॉल संघाचे व्यवस्थापक म्हणून काम पाहिलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघानं 1956-57 आणि 1957-58 अशी दोनवेळा संतोष ट्रॉफी जिंकली. त्याच्या पुढल्या वर्षीही हॅट्ट्रिकची संधी साधणार, असं वाटत होतं; पण अखेरच्या फेर्‍यांमध्ये चुका घडल्या आणि हॅट्ट्रिक चुकली; पण उत्तम खेळाडू तोच असतो, जो यश आणि अपयश दोन्हीही पचवू शकतो, हे रहीम यांनी कायमच आपल्या वागण्यातून जगाला दाखवून दिलं.

भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ

एकीकडे हैदराबादेत काम करत असतानाच, 1949 मध्ये सिलोन दौर्‍यावर गेलेल्या भारतीय संघाला प्रशिक्षण देण्याची जबाबदारी रहीम यांना देण्यात आली. 1950 मध्ये ते भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचे व्यवस्थापकही बनले. भारताला सर्वोत्तम संघ बनविण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. आशियातील सर्वोत्तम संघ म्हणून भारत नावारूपाला आला होता.

मार्च 1951 मध्ये, नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई खेळांमध्ये रहीम यांनी भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. खचाखच भरलेल्या मैदानात पंतप्रधान पंडित नेहरूंच्या उपस्थितीत भारतानं इराणचा 1-0 असा पराभव करून हा विजय मिळवला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या काही वर्षांतच झालेल्या या स्पर्धेनं भारताचं नाव जगभरात नेलं. क्रीडा क्षेत्रात भारताचं नाव मोठं व्हावं, यासाठी जे काही प्रयत्न होत होते त्यात रहीम यांचा मोठा वाटा होता, हे विसरून चालणार नाही.

हॉकीमध्ये ध्यानचंद आणि फुटबॉलमध्ये रहीम यांचं नाव तेव्हा गाजत होतं. भारतीय फुटबॉल संघानं 1956 च्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्येही उपांत्य फेरी गाठली. भारताची ही कामगिरी आजही भारताची फुटबॉलमधील सर्वात मोठी कामगिरी मानली जाते. 1958 मध्ये एका सामन्यात भारतानं फ्रान्सलाही जोरदार टक्कर दिली होती. भारतीय संघानं जग जिंकावं, असा रहीम यांचा प्रयत्न होता; पण काळाचा फेरा फिरला आणि रहीम यांचं हे स्वप्न आजपर्यंत तरी पूर्ण झालं नाही, असं दुर्दैवानं म्हणावं लागतंय.

रहीम साब यांचा संघर्ष रुपेरी पडद्यावर

'गेल्या शतकातील 50 आणि 60 च्या दशकात भारतीय फुटबॉल या उंचीवर होता, हे आजच्या पिढीला खरं वाटणार नाही. त्या महान खेळाचा नायक असलेले रहीम साब आज विस्मृतीत गेले आहेत. हा सिनेमा करेपर्यंत मलाही त्यांच्याबद्दल फारसं माहीत नव्हतं. किमान यापुढे तरी ते कळायला हवं, यासाठीच आमचा हा सिनेमा आहे,' असे उद्गार रुपेरी पडद्यावर रहीम यांची भूमिका साकारणार्‍या अजय देवगण यांनी काढले आहेत.

अजय देवगण यांची मुख्य भूमिका असलेला आणि बोनी कपूरनिर्मित 'मैदान' हा सिनेमा 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होतोय. या चित्रपटाला ए. आर. रेहमान यांनी संगीत दिलं असून, 'टीम इंडिया है हम' हे गाणं चांगलंच लोकप्रिय होतंय. खेळ आणि देशप्रेम या दोन्ही गोष्टी घेऊन मैदानी खेळाची जादू हा सिनेमा रुपेरी पडद्यावर साकारण्यासाठी सज्ज झालाय.

या सिनेमाचं पुढे काय होईल, हे कुणालाच सांगता येणार नाही; पण या सिनेमाच्या निमित्तानं भारताच्या क्रीडा इतिहासात असं काही तरी घडलं होतं, हे तरी पुढल्या पिढ्यांसाठी नोंदवलं जाईल. आज खेळ म्हटले की, टी.व्ही.-मोबाईलपासून गल्लीपर्यंत फक्त क्रिकेटची हवा असताना फुटबॉलसारख्या खेळाकडं लक्ष वेधलं जाईल. त्यातून न जाणो कुणी नवा 'रहीम साब' जन्माला यावा, असं स्वप्न पाहायला काहीच हरकत नाही. कारण, 'स्वप्नं पाहिली, तरच ती साकारता येतात,' हेच रहीम साब यांनी आपल्याला शिकवलंय.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news