मुंबई, चंदन शिरवाळे : प्रदेश काँग्रेसच्या तिजोरीत खडखडाट झाला असून आमदारांच्या स्नेहभोजनाचे बिल देण्यासाठी या पक्षाला बँकेतील एफडी (मुदत ठेव) मोडावी लागल्याचे समोर आले आहे.
काही वर्षांपूर्वी सत्ता आणि एकीच्या बळावर सक्षम झालेला काँग्रेसचा 'हात' आता सर्वच बाबतीत कमकुवत होत चालला आहे. ज्येष्ठ नेत्यांनी पक्षासाठी निधी देणे बंद केल्यामुळे प्रदेश काँग्रेसची तिजोरी रिकामी पडली आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 3 ऑगस्ट रोजी पक्षाच्या आमदारांसाठी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या स्नेहभोजनाचे बिल देण्यासाठी काँग्रेसला बँकेतील एफडी (मुदत ठेव) मोडावी लागली.
प्रदेश कार्यालयातील वीज आणि पाणी बिल, पाहुण्यांचे चहापान तसेच कर्मचार्यांच्या वेतन खर्चासाठी आमदार आणि खासदारांकडून निधी गोळा केला जातो. प्रदेश अध्यक्ष किंवा त्यांनी नेमून दिलेले पदाधिकारी ही जबाबदारी पार पाडतात. मुंबई काँग्रेस कार्यालयातील अशा प्रकारच्या खर्चासाठी नगरसेवकांकडून प्रत्येकी दरमहा एक लाख रुपये जमा केले जातात.
याखेरीज मुंबई महापालिका विरोधी पक्षनेत्यावरही अधिकची जबाबदारी दिली जात असल्याचे समजते. सत्ता असतानाही हा निधी सहज जमा होत होता.
राज्यात 1995 मध्ये शिवसेना – भाजप युती सत्तेत आल्यानंतर तत्कालीन काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्यावर प्रदेश कार्यालय तर मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांच्यावर कर्मचार्यांचे वेतन आणि इतर खर्चाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. पक्षातील ज्येष्ठ नेते आणि उद्योगपतींशी असलेल्या चांगल्या संबंधामुळे या दोन्ही नेत्यांनी ती जबाबदारी पार पाडली होती.
चव्हाणांनी बंद केले होते चहापान
अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनीही पक्षाला आर्थिक संजीवनी दिली होती. काटकसरीचा भाग म्हणून त्यांनी कार्यालयातील चहापान बंद केले होते. त्यांच्या आवाहनानंतर काही आमदारांनी अधिकचा निधी दिला. मात्र तत्कालीन काँग्रेस नेते नारायण राणे यांनी निधी देण्यास नकार दिला. देश आणि राज्यात 50 ते 60 वर्षे सत्तेत असलेल्या पक्षाने कार्यालयाचा खर्च भागविण्यासाठी अशा प्रकारे निधी गोळा करावा हे आपल्याला मान्य नाही, अशी भूमिका त्यांनी घेतल्याची माहिती काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली.
निधीच्या बाबतीत आताही असेच चित्र आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे दोन नेते पक्षासाठी खर्च करत होते. मात्र विधान परिषद निवडणुकीवेळी थोरात यांनी आपले भाचे सत्यजित तांबे यांना अप्रत्यक्ष मदत केल्याचा आरोप पटोले यांनी केल्यानंतर नाराज झालेल्या थोरातांनी डिसेंबर 2022 पासून पक्षाला निधी देण्याचे बंद केले आहे. खरे तर पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून ते नाराज आहेत. पटोलेंच्या आरोपाची केंद्रीय नेतृत्वाने दखल घेतल्यामुळे त्यांना विधानसभा विरोधी पक्षनेतेपदही गमवावे लागल्याचे बोलले जाते. अन्यथा विजय वडेट्टीवर यांना हे पद मिळाले नसते, अशी चर्चा ऐकायला मिळते.
पक्षसंघटनेत पटोले एकाकी
नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर अशोक चव्हाणसुद्धा नाराज आहेत. त्यांनीही निधीबाबत हात आखडता घेतला आहे. अन्य प्रस्थापित नेतेही पटोले यांना सहकार्य करत नसल्याने काँग्रेसची तिजोरी खंगत चालली आहे. त्यामुळे 3 ऑगस्ट रोजी आमदारांच्या स्नेहभोजनाच्या बिलाच्या तरतुदीसाठी एक महिना आधीच काँग्रेसची बँकेतील एफडी मोडावी लागली, अशी माहिती काँग्रेसच्या एका नेत्याने दिली.