शारजाह; वृत्तसंस्था : दोन वेळचे जेतेपद मिळवणारा कोलकाता नाईट रायडर्सचा संघ (RR vs KKR) इंडियन प्रीमिअर लीगच्या शेवटच्या राऊंड रॉबिन सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध मोठ्या विजयाची नोंद करत 'प्ले ऑफ'मध्ये आपले आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. कोलकाताचे 13 सामन्यांत 12 गुण आहेत आणि ते गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहेत. ते गतविजेता मुंबई इंडियन्सपेक्षा नेट रन रेटनेही पुढे आहेत. कोलकाता आणि मुंबई हे दोन्ही संघांनी शेवटचा सामना जिंकल्यास 'प्ले ऑफ'साठी चौथ्या संघाचा निर्णय हा रन रेटने होईल. त्यामुळे इयान मॉर्गनच्या नेतृत्वाखाली असलेल्या संघाला (0.294) आपला फॉर्म कायम ठेवावा लागेल. मुंबईचा रन रेट -0.048 आहे.
कोलकाताने स्पर्धेच्या दुसर्या सत्रात मिश्र कामगिरी केली आहे. ज्यामध्ये त्यांनी चार सामन्यांत विजय मिळवला तर, दोन सामन्यांत त्यांना पराभूत व्हावे लागले. दुसर्या सत्रात कोलकाताचे फलंदाज व्यंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांनी चमकदार कामगिरी केली. गेल्या लढतीत शुभमन गिलनेदेखील अर्धशतकी खेळी केली. नितीश राणानेदेखील निर्णायक क्षणी धावा केल्या आहेत. मात्र, कर्णधार इयान मॉर्गनचा फॉर्म संघाच्या द़ृष्टीने चिंतेचा विषय आहे. गोलंदाजीत वरुण चक्रवर्ती व सुनील नारायणी यांनी चमक दाखवली. आंद्रे रसेल आणि लॉकी फर्ग्युसन यांच्या अनुपस्थितीत टीम साऊदी व शिवम मावी यांनी जलदगती गोलंदाजीची जबाबदारी पार पाडली आहे.
दुसरीकडे राजस्थान रॉयल्सचा संघ 'प्ले ऑफ'च्या शर्यतीतून बाहेर आहे आणि आठ संघांच्या गुणतालिकेत ते 13 सामन्यांत 10 गुणांसह सातव्या स्थानी आहेत. राजस्थानचा प्रयत्न कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध विजय मिळवून शेवट गोड करण्याचा असणार आहे. यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन वगळता राजस्थानच्या इतर कोणत्याही फलंदाजांना फारशी चमक दाखवता आलेली नाही.
कोलकाता नाईट रायडर्स : इयान मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, गुरकिरत सिंह मान, करुण नायर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, हरभजन सिंग, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, पवन नेगी, एम. प्रसिद्ध कृष्णा, संदीप वॉरियर, टीम साऊदी, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, बेन कटिंग, शाकिब-अल-हसन, सुनील नारायणी, व्यंकटेश अय्यर, शेल्डन जॅक्सन, टीम सेफर्ट.
राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, एविन लुईस, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, ओशेन थॉमस, मुश्तफिजूर रेहमान, तबरेज शम्सी, ग्लेन फिलिप्स, चेतन सकारिया, रियान पराग, राहुल तेवातिया, आकाश सिंह, अनुज रावत, के. सी. करियप्पा, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे, श्रेयस गोपाल, कार्तिक त्यागी, मयंक मार्कण्डेय, जयदेव उनाडकट, कुलदीप यादव, महिपाल लोमरोर.