Valentine special : ‘त्या’ काॅफी डेटवर पडली होती रोहित पवारांची विकेट….

Valentine special : ‘त्या’ काॅफी डेटवर पडली होती रोहित पवारांची विकेट….

पुढारी डिजीटल : कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांची राजकीय टोलेबाजी आपण अनुभवली आहे. महाराष्‍ट्रातील मुद्द्यांवर ते अगदी आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदीही  रोहित पवार यांची निवड झाल्‍यावर काही क्रिकेट सामन्‍यांच्‍या उद्घाटनात त्‍यांची मैदानावरची फटकेबाजीही अनेकांनी पाहिली असेल. पण या त्‍यांची विकेट एका कॉफी डेटवर पडल्‍याचे कितीजणांना माहिती आहे. या कणखर नेत्‍याच्‍या मनाचा हळवा कोपरा व्‍हॅलेंटाईन डेच्‍या निमित्ताने आपण आज जाणून घेवू….

प्रत्‍येकाचे आयुष्‍यात एकदातरी प्रेम केलेले असते. जरी त्‍याला व्‍यक्‍त होता आले नाही तरी त्‍याला आवडणारी एखादी व्‍यक्‍ती नेहमी डोक्‍यात घोंगावत असते. अशावेळी प्रेम व्यक्त करण्याची खास अशी पद्धत शिकण्‍यासाठी कोणते पुस्‍तक, ग्रंथ तुम्‍हाला मदत करु शकत नाही.  अगदीच सिनेमात दाखवल्याप्रमाणे हिरोईन आल्यावर हिरोच्या मागे वाजणाऱ्या व्हायलिन खऱ्या आयुष्यात असतात असंही नाही. फक्त ती व्यक्ती भेटल्यावर आपोआप समजून जातं हीच ती.  प्रेमाची ही व्याख्या जशी तुम्हाला आम्हाला लागू पडते त्याला राजकारणीही अपवाद नाहीत. राजकारणाच्या क्षेत्रात मितभाषी आणि नेमकं बोलणारं व्यक्तिमत्व म्हणून आमदार रोहित पवार यांची ओळख आहे.  पण एरवी शांत असलेल्या रोहित यांना एका खास व्यक्तीने पहिल्याच भेटीत क्लीन बोल्ड केलं होतं.

पुढारी डिजीटलच्या माध्यमातून आमदार रोहित पवार यांनीही शेयर केला आहे त्यांच्या lady love आणि सुविद्य पत्नी कुंती पवार यांच्याशी पहिल्या भेटीचा किस्सा…

विद्यमान आमदार असलेल्या रोहित पवार यांचा विवाह पुण्यातील कुंती मगर यांच्याशी झाला आहे. खर पाहता हा रोहित आणि कुंती यांचं अरेंज मॅरेज आहे. पहिल्याच भेटीदरम्यान रोहित यांना कुंती मनापासून भावल्या. पहिल्या भेटीच्या कॉफी डेटचा किस्सा पुढारीशी शेयर करताना रोहित म्हणतात, 'मी तीन भेटायल अगदी साधा गेलो होतो. एक फॉर्मल शर्ट, पायात कोल्हापुरी चप्पल आणि सोबतीला बाईक.
जेव्हा त्यांना भेटलो त्याच वेळी मला त्या आवडल्या.

कुंती यांच्या घरी लग्नाची मागणी यापूर्वी गेली होतीच. काही जवळच्या व्यक्तींकडून कुंती यांच्याबाबत समजलं. पण भेटल्यावर मी होकार द्यायला अजिबात वेळ लावला नाही. त्यांना भेटल्यावर मला जाणवलं की माझं पहिलं प्रेम आणि शेवटचं प्रेम म्हणजे त्या आहेत.'

रोहित यांनी कुंती यांना पहिल्या भेटीनंतर होकार दिला खरा पण त्यांना होकार मिळण्यासाठी मात्र जवळपास २० – २५ दिवसांचा वेळ घेतला. याबाबत बोलताना कुंती म्हणतात, 'पहिल्यांदा त्यांनी हो म्हणलं पण त्यानंतर आम्ही अनेकदा भेटलो. मी बारामतीला त्यांच्या घरी गेले. या काही भेटीनंतर मलाही समजलं की पार्टनर म्हणून रोहितच माझी निवड आहेत.'

खरंतर रोहित हे मितभाषी म्हणून ओळखले जातात. खूप विचार करून आणि मोजक्या शब्दात व्यक्त होण्याकडे त्यांचा नेहमीच कल असतो. अर्थात कुंती यांची निवड करताना देखील पार्टनरबाबतच्या त्यांच्या कल्पना अगदी स्पष्ट होत्या. याबाबत बोलताना ते म्हणतात, ' स्पष्ट बोलणारी, साधी राहणारी विशेष म्हणजे बोलक्या डोळ्यांची पार्टनर असावी असं मला नेहमी वाटत होतं. कुंतीना भेटल्यावर माझ्या सगळ्या अपेक्षांच्या निकषात त्या बसत असल्याची जाणीव झाली. अर्थातच होकार आधी घरच्यांना कळवला होता.'

ही जोडी शांत आणि समंजस आहेच. पण इतरांप्रमाणेच अनेकदा कुंतीही रोहित यांच्यावर रूसताना दिसून येतात. अर्थातच हा रुसवा काही वेळापुरता असला तरी याची कारणं अनेकदा व्यस्ततेशीच जोडलेली असतात. याबाबत शेयर करताना रोहित म्हणतात, ' मी घरच्यांना वेळ देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. पण अनेकदा कामात असल्यावर घरच्या कार्यक्रमांना वेळेवर पोहोचणं शक्य होत नाही. विशेषत: तो सासरवाडीचा कार्यक्रम असेल तर कुंती अनेकदा रागावतात. याशिवाय मी मुलांना वेळ द्यावा याकडे त्यांचा कटाक्ष असतो.'

(शब्दांकन : अमृता चौगुले पाटील )

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news