पुढारी ऑनलाईन डेस्क : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाने (Team India) चमकदार कामगिरी केली. दिल्ली कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 6 गडी राखून विजय मिळवताच रोहितच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद झाली. त्याने कसोटीत माजी कर्णधार एमएस धोनीची बरोबरी केली. कर्णधार म्हणून पहिले 4 कसोटी जिंकणारा तो दुसरा कर्णधार ठरला आहे.
हिटमॅन रोहितची (Rohit Sharma) आतापर्यंतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द शानदार राहिली आहे. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे. वैयक्तिक कामगिरीबरोबरच तो कर्णधारपद जबाबदारीने सांभाळत आहे. रोहित कर्णधार म्हणून चमकला आहे. तो चतुराईने गोलंदाजीत बदल करतो आणि डीआरएस घेण्यातही तो मास्टर बनला आहे. द्विपक्षीय मालिकेत रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने शानदार कामगिरी केली आहे.
रोहितने 2022 साली मोहली येथे श्रीलंकेविरुद्ध पहिल्यांदा कसोटी संघाचे नेतृत्व केले. त्या सामन्यात टीम इंडियाने एक डाव आणि 222 धावांनी विजय मिळवला. यानंतर हिटमॅनच्याच (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारताने श्रीलंकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना 238 धावांनी जिंकला.
टीम इंडियाने (Team India) नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दोन कसोटी सामने जिंकले. संघाचे यशस्वीरित्या नेतृत्व केले रोहित शर्मानेच. यासह कर्णधार म्हणून पहिले चार सामने जिंकणारा तो भारताचा दुसरा तर जगातील तिसरा खेळाडू ठरला. त्याच्या व्यतिरिक्त, धोनी आणि बाबर आझम हे गेल्या 50 वर्षांतील एकमेव कर्णधार आहेत ज्यांनी पहिले चार कसोटी सामने जिंकले आहेत.
विराट कोहलीने (Virat Kohli) 2014 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्यांदा टीम इंडियाचे नेतृत्व केले. त्या सामन्यात भारताला 48 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. सौरव गांगुलीने (sourav ganguly) बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात प्रथमच भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्या सामन्यात टीम इंडियाने 9 विकेट्सने विजय मिळवला होता, पण कर्णधार म्हणून चौथ्या सामन्यात गांगुलीला मुंबईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 10 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता.
रोहितची वैयक्तिक कामगिरी पाहिली तर तो प्रभावी ठरला आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 47 कसोटी सामन्यांच्या 80 डावांमध्ये 3320 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एक द्विशतक आणि 9 शतके झळकावली आहेत. रोहितने 14 अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याची सर्वोत्तम कसोटी धावसंख्या 212 आहे. रोहितने वनडे आणि टी-20 सामन्यांमध्येही चांगली कामगिरी केली आहे. त्याने भारतासाठी 241 एकदिवसीय आणि 148 टी-20 सामने खेळले आहेत.