Rohit Sharma T20 Captain : रोहित शर्मा टी-20 संघाचे नेतृत्व करण्यास सज्ज! विश्वचषकातही खेळण्याची शक्यता

Rohit Sharma T20 Captain : रोहित शर्मा टी-20 संघाचे नेतृत्व करण्यास सज्ज! विश्वचषकातही खेळण्याची शक्यता

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma T20 Captain : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माबाबत मोठी बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिटमॅन आगामी टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे. याशिवाय हार्दिक पंड्या दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेतही कर्णधारपद भूषवू शकतो.

अलीकडेच अशा बातम्या आल्या होत्या की, रोहित कदाचित टी-20 क्रिकेट खेळणार नाही आणि तो फक्त कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करेल. आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरूनही त्याला हटवण्यात आले आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार हिटमॅन हा 2024 च्या टी-20 विश्वचषकात खेळण्यासोबतच संघाचे नेतृत्वही करू शकतो. (Rohit Sharma T20 Captain)

अजित आगरकर करणार रोहितशी चर्चा

वृत्तानुसार, आगामी अफगाणिस्तान मालिकेत रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्वही करू शकतो. मात्र, अंतिम निर्णय निवडकर्त्यांना घ्यावा लागेल. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत खुलासा करताना सांगितले की, 'कर्णधार कोणाला बनवायचे हे पूर्णपणे निवडकर्त्यांवर अवलंबून आहे. रोहित शर्मासोबत आमची दीर्घ चर्चा झाली आहे. तो वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत संयुक्तरित्या होणा-या टी-20 विश्वचषकात कर्णधारपदासाठी तयार आहे. मात्र, इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर हे रोहित शर्माशी चर्चा करतील आणि त्यानंतरच रोहित अफगाणिस्तान विरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळेल की नाही याबाबत निर्णय घेतील.' (Rohit Sharma T20 Captain)

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळवला जाणार आहे. याआधी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-20 मध्ये सूर्यकुमार यादवने नेतृत्व होते. पण सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्याचबरोबर हार्दिक पंड्याही पूर्णपणे तंदुरुस्त नाही.

पंड्या आणि सूर्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा संघाचे कर्णधारपद सांभाळू शकतो. 2024 च्या टी-20 विश्वचषकापूर्वी रोहित शर्माला पुन्हा एकदा या फॉरमॅटमध्ये स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळेल अशी चर्चा आहे. मात्र, अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत कोणाला कर्णधारपद द्यायचे हे निवडकर्त्यांवर अवलंबून असेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news