पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma Record : रोहित शर्माने राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्धच्या तिस-या कसोटीत मोठा विक्रम रचला. गुरुवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून रोहितने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात खराब झाली. यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार झटपट बाद झाल्यानंतर भारतीय कर्णधाराने रवींद्र जडेजाच्या साथीने भारताचा डाव सावरला. रोहितने शतकी खेळी साकारली. या दरम्यान, त्याने 66 धावा पूर्ण करताच माजी कर्णधार सौरव गांगुलीचा 2008 मधील एक मोठा विक्रम मोडला.
राजकोट कसोटीत रोहित शर्माने 66 धावा करताच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामने) सौरव गांगुलीपेक्षा जास्त धावा करणारा फलंदाज बनला आहे. आता तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू ठरला आहे. सौरव गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 424 सामने खेळून 18575 धावा केल्या होत्या. 2008 मध्ये त्याने क्रिकेटला अलविदा केला. म्हणजे निवृत्त होऊन जवळपास 17 वर्षे झाली आहेत.
रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 469 सामने खेळून 18575 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याने 56 कसोटी सामने खेळून 3827 हून अधिक धावा केल्या आहेत. वनडेमध्ये त्याने 262 सामने खेळले असून 10709 धावा केल्या आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माने 151 सामने खेळून 3974 धावा केल्या आहेत.
सचिन तेंडुलकरने भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 664 सामन्यांमध्ये 34357 धावा आहेत. विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. कोहलीने 522 सामने खेळून 26733 धावा केल्या आहेत. यानंतर राहुल द्रविडचा क्रमांक लागतो, त्याने 509 सामने खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 24208 धावा केल्या आहेत.