पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma : आयपीएलच्या 15 व्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाची अवस्था वाईट झाली होती. त्यांचा संघ कधी नव्हे ते 10 व्या स्थानावर घसरला होता. यंदाच्या मोसमातही रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एमआय संघ काही अप्रतिम कामगिरी करू शकलेला नाही.
पहिले दोन सामने गमावल्यानंतर मुंबईने सलग तीन सामने जिंकून दमदार पुनरागमन केले. मात्र पुन्हा एकदा त्यांना सलग दोन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ज्यामध्ये केवळ गोलंदाजीच नाही तर फलंदाजीही मुंबईसाठी चिंतेचा विषय आहे. सूर्यकुमार यादवचा फॉर्म परतण्याच्या मार्गावर आहे. पण दुसरीकडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) मात्र सातत्याने अपयशी ठरत आहे. त्यामुळे आता पुढील महिन्यात होणाऱ्या डब्ल्यूटीसी फायनलसाठी रोहित शर्माने आयपीएलमधून थोड्या काळासाठी ब्रेक घ्यावा, अशी चर्चा सुरू झाली आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना सांगितले की, रोहित शर्माने आता आयपीएलमधून ब्रेक घ्यावा. त्याने मुंबईसाठी शेवटचे तीन ते चार सामने खेळावेत असे मला वाटते. जेणेकरून तो फ्रेश होऊन डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी स्वत:ला तयार करू शकेल. आपला बॅटिंग फॉर्म परत मिळवण्यासाठी ही स्ट्रॅटेजी त्याला उपयुक्त ठरेल, असे त्यांनी मत व्यक्त केले.
रोहितने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत 135.07 च्या स्ट्राइक रेटने सात डावात केवळ 181 धावा केल्या आहेत. त्याचा संघ मुंबई इंडियन्सही सात सामन्यांत चार पराभव पत्करून सातव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, रोहितला आतापर्यंत आयपीएलच्या चालू हंगामात केवळ एकदाच सर्वाधिक 65 धावांची खेळी करता आली आहे. 20 ते 45 धावांदरम्यान त्याने चारवेळा आपली विकेट गमावली आहे. या दृष्टिकोनातून रोहितने आता ब्रेक घेऊन फ्रेश मूडमध्ये पुनरागमन केले पाहिजे, असे अनेक माजी खेळाडूंचे म्हणणे आहे.
गेल्या पाच वर्षांची आकडेवारी पाहिली, तर रोहितची बॅट आयपीएलमध्ये फारशी चाललेली नाही. मागच्या पाच आयपीएलमध्ये त्याने केवळ 30 च्या सरासरीने धावा केल्या आहे. यात 2022 च्या हंगामात त्याच्या बॅटमधून 14 सामन्यांमध्ये 19.14 च्या सरासरीने केवळ 268 धावा आल्या. याशिवाय 2018 च्या आयपीएलमध्ये रोहितच्या बॅटने 14 सामन्यात 23.83 च्या सरासरीने 286 धावा केल्या.
2019 चा आयपीएल हंगाम रोहितसाठी त्यातला त्यात चांगला गेला. त्या वर्षी त्याने 15 सामन्यात 28.92 च्या सरासरीने 405 धावा जमवल्या. तर, 2020 मध्ये त्याच्या बॅटने 12 सामन्यात 27.66 च्या सरासरीने 332 धावा केल्या. 2021 मध्ये 13 सामन्यात 29.30 च्या सरासरीने त्याच्या बॅटने फक्त 381 धावा केल्या. आयपीएलमध्ये रोहितची बॅट थंड पडल्याचे पाहून त्याने चालू हंगामातून ब्रेक घ्यावा आणि 7 जूनपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या डब्ल्यूटीसी फायनलवर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला अनेकांनी दिला आहे.