गोदड महाराज भक्त निवासासाठी 5 कोटी, आमदार रोहित पवारांनी शब्द पाळला

गोदड महाराज भक्त निवासासाठी 5 कोटी, आमदार रोहित पवारांनी शब्द पाळला

कर्जत : पुढारी वृत्तसेवा

गोदड महाराजांच्या भक्तनिवासासाठी आमदार रोहित पवार यांनी नगर विकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. गोदड महाराज भक्त निवासासाठी पाच कोटींचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला. बाहेर गावावरून येणारे भक्त, महंत व धार्मिक गुरूंचा राहण्याची व्यवस्था, त्यासोबत गरजू लोकांसाठी छोटेखानी विवाह समारंभ करण्याची व्यवस्था, जेवणासाठीची व्यवस्था या भक्तनिवासात असणार आहे. गोदड महाराजांच्या प्राचीन ग्रंथाचे संग्रहालयासाठीही या इमारतीत जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

आमदार रोहित पवार यांनी या भक्त निवासासाठीचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे दिला होता. वेळोवेळी यासंबंधी आवश्यक तो पाठपुरावा शासनस्तरावर केला होता. विधानसभेच्या निवडणुकीवेळी, कर्जत नगरपंचायत निवडणुकीवेळी आमदार रोहित पवार यांनी जनतेला भक्तनिवासाची इमारत उभारली जाईल, असा शब्द दिला होता. आता या भक्तनिवासासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणल्याने आमदार पवार यांनी दिलेला शब्द पाळला असल्याचे या माध्यमातून दिसून येत आहे.

दरम्यान, नगर विकास विभागातर्फे मंजूर करण्यात आलेल्या कामात भक्त निवासासह संतश्री गोदड महाराज मंदिर परिसराचा विकास करणे, सुशोभीकरण करणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, दिवाबत्तीची सोय करणे व तात्पुरती बैठक व्यवस्था करणे, यासोबतच सत्संग हॉलची उभारणी आदी कामांचा समावेश आहे.

स्वच्छ मनाने व चांगल्या विचाराने जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करतो, तेव्हा त्याला नक्कीच यश येतं. संत गोदड महाराजांचे कार्य खूप मोठे होते. त्यांचे विचार आपण महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोचवणार आहोत. त्यानंतर विविध भागातील अनेक लोक व अध्यात्मिक क्षेत्रातील येणारे मान्यवरांना चांगली व्यवस्था मिळावी, यासर्व लोकांची उत्तम सोय कर्जत शहरात व्हावी, या उद्देशाने या भक्तनिवासाची उभारणी करत आहोत.
आमदार रोहित पवार, कर्जत-जामखेड मतदारसंघ

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news