सरुड : शाहूवाडी तालुक्यातील आंबा-तळवडे येथील सशस्त्र दरोड्याचा (Robbery case) छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह शाहूवाडी पोलिसांच्या संयुक्त शोध पथकांना पंधरा दिवसांत यश मिळालेे.
मलकापूर येथे गुरुवारी पोलिसांनी सापळा रचून दरोड्यात प्रत्यक्ष सहभागी आठ जणांपैकीसचिन रामचंद्र नाचनकर (वय 37, रा. कोतोली, ता. शाहूवाडी), मंदार तानाजी चोरगे (34, रा. अवधूत कार्टेक, भारती विद्यापीठ, कात्रज-पुणे), शिवाजी हरिबा कदम (रा. अमेणी, ता. शाहूवाडी), नामदेव उर्फ अविनाश जालिंदर कदम (26, रा. पाडळेवाडी, ता. शिराळा, जि. सांगली) व शुभम ऊर्फ सोन्या शंकर चोरगे (22, रा. वांगणी, ता. वेल्हा, जि. पुणे) या संशयित पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली डस्टर कार, स्विफ्ट कार, बुलेट मोटारसायकल व 4 मोबाईल संच असा 8 लाख 72 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
शुक्रवारी त्यांना शाहूवाडी न्यायालयात हजर केले जाणार असून गुन्ह्यातील उर्वरित संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली. (Robbery case)
पोलिसांनी दिलेली माहिती अशी : गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला संशयित दरोडेखोर शिराळा परिसराकडे निघाल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलिसांच्या पथकाने पेठ नाका ते शिराळा दरम्यान रस्त्यावर सापळा रचला. स्विफ्ट कारमधून आलेल्या नामदेव ऊर्फ अविनाश जालिंदर कदम व शुभम ऊर्फ सोन्या शंकर चोरगे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील अधिक चौकशीत दरोड्याच्या संपूर्ण गुन्ह्याची उकल झाली.
फिर्यादी शांतय्या शंकराय्या स्वामी यांच्या मालकीचे कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय मार्गावरील हॉटेल राधाकृष्ण हे संशयित शिवाजी हरिबा कदम याने भाडेतत्त्वावर चालवायला घेतले होते. स्वामी यांनी स्वतःची जमीन विकल्याने त्यांच्या घरात मोठी रक्कम असल्याचे कदम याला माहीत होते. यातूनच कदम याने साथीदार सचिन नाचनकर याच्या मदतीने दरोड्याचा कट रचला. सराईत मंदार चोरगे, नामदेव कदम, शुभम ऊर्फ सोन्या चोरगे तसेच अन्य साथीदारांनी मिळून शांतय्या स्वामी यांच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकल्याचे चौकशीत समोर आले.
दरम्यान, आंबा परिसरातील तळवडे गावातील बांधकाम व्यावसायिक शांतय्या शंकराय्या स्वामी यांच्या घरात 23 नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घुसलेल्या अज्ञात सशस्त्र दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून स्वामी पिता-पुत्रावर कोयत्याने हल्ला चढवला होता. तसेच घरातील महिलांचे हातपाय बांधून, तोंडाला चिकटपट्ट्या लावून लहान मुलांसह खोलीत डांबून ठेवले होेते.
दरोडेखोरांनी रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने तसेच फिर्यादी स्वामी यांची बोलेरो जीप असा सुमारे 10 लाख 500 रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला होता. या घटनेने पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबा परिसरात भीतीची छाया पसरली होती.
दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, उपविभागीय पोलिस अधीक्षक रवींद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, शशिराज पाटोळे (सायबर), विजय पाटील (शाहूवाडी), स.पो.नि. किरण भोसले, उत्कर्ष वझे आदींसह कार्यरत एकूण नऊ तपास पथकांतील कर्मचार्यांनी अथक परिश्रम करून दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणला.
स्वामी घरात आहेत का? असे विचारून दरोडेखोरांनी घरात प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले होते. यावरूनच फिर्यादीच्या ओळखीतील लोकांनीच हे दरोड्याचे धाडस केल्याची खात्री पोलिस अधिकार्यांना झाली होती. त्यानुसार तपासाची दिशा निश्चित करताना फिर्यादीशी व्यावसायिक संबंध तसेच जमीन व्यवहारातून झालेला वाद अथवा तत्सम बाबींना समोर ठेवून अनेकांकडे चौकशीचा सपाटाच पोलिसांनी लावला. यातूनच संशयित शिवाजी कदम याच्या हालचालींवर पोलिसांनी बारकाईने लक्ष केंद्रित करून उर्वरीत संशयितांना अलगद जाळ्यात घेत मुसक्या आवळल्या.