पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय वंशाचे ऋषी सुनक (rishi sunak) यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. तिसर्या फेरीत त्यांनी विजय तर मिळवलाच पण या फेरीत 115 मते मिळवून ते पहिल्या स्थानावर राहिले आहेत. तिसऱ्या फेरीसाठी एकूण 357 मते पडली. या फेरीत ऋषी सुनक यांचे प्रतिस्पर्धी पेनी मॉर्डेंट 82 मतांसह दुसऱ्या, लिझ ट्रस 71 मतांसह तिसऱ्या आणि कॅमी बडेनोच 58 मतांसह चौथ्या क्रमांकावर राहिले. 31 मते मिळालेले टॉम तुगेंधत हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
सुनक (rishi sunak) यांनी तिस-या फेरी बाजी मारल्यानंतर त्यांना पाठिंबा देणाऱ्या ब्रिटनचे माजी आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांचे वक्तव्य समोर आले. ते म्हणाले की, ऋषी हे पंतप्रधान होण्यासाठी सर्वात योग्य उमेदवार आहेत. ते आशियाई वंशाचे असले तरी काही फरक पडत नाही, त्याच्याकडे पंतप्रधान होण्याची आणि जबाबदारी पार पाडण्याची क्षमता आहे. मी त्याच्यासोबत (ऋषी) खूप जवळून काम केले आहे. ते समस्या चांगल्या प्रकारे हाळतात, असा विश्वास व्यक्त केला आहे.
ब्रिटनमधील सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाला पाठिंबा देणाऱ्या जवळपास निम्म्या मतदारांचा असा विश्वास आहे की, ऋषी सुनक हे एक चांगले पंतप्रधान होऊ शकतील. नुकत्याच झालेल्या ओपिनियन पोलमध्ये ऋषी सुनक हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले. मतदान करणारे हे सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे समर्थक होते. सध्या काळजीवाहू पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे या पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहेत. नुकतेच जॉन्सन यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना सांगितले होते की, तुम्हाला हवे असेल तर कोणाचेही समर्थन करा, पण ऋषी सुनक यांना पाठिंबा देऊ नका.
ऋषी सुनक हे इन्फोसिस कंपनीचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. ते रिचमंड, यॉर्कशायर येथून खासदार असून ब्रिटनचे अर्थमंत्री होण्यापूर्वी ते कोषागाराचे मुख्य सचिव होते. ऋषी सुनक यांनी तीन फेऱ्यांनंतर चांगली आघाडी राखली असली तरी त्यांच्या मार्गात अजूनही अनेक अडचणी आहेत. बोरिस जॉन्सन यांचा ऋषी सुनक यांना पंतप्रधान म्हणून विरोध आहे. सुनक यांच्या व्यतिरिक्त अन्य उमेदवाराला पाठिंबा देण्याची त्यांची तयारी आहे.