तो एक ‘Miracle Man’.. ! डॉक्‍टरांनी सांगितली ऋषभ पंतच्‍या पुनरागमनाची गोष्‍ट

 भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऋषभ पंतच्या पुनरागमनाची कहाणी सांगणारा डॉक्टर दिनशॉ पार्डीवाला यांचा एक व्‍हिडिओ शेअर केला आहे.
 भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऋषभ पंतच्या पुनरागमनाची कहाणी सांगणारा डॉक्टर दिनशॉ पार्डीवाला यांचा एक व्‍हिडिओ शेअर केला आहे.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : एका क्षणात त्‍याचे सारं आयुष्‍य बदललं. जीवघेणा अपघात झाला. त्‍याच्‍यातील 'क्रिकेट' संपलं, अशी चर्चाही सुरु झाली. मात्र त्‍याचा केवळ स्‍वत:वर विश्‍वास होता. कोणताही चमत्‍कार होणार नाही, याची त्‍याला जाणीव होती. जिद्द, आत्‍मविश्‍वास आणि प्रयत्‍नांच्‍या पराकाष्‍ठेवर पुन्‍हा उभे राहत आपणच 'चमत्‍कार' करायचा, असा निर्धार त्‍याने केला. अखेर हाच निर्धार कामी आला. तो पुन्‍हा एकदा ताठ मानेने मैदानात खेळण्‍यासाठी उभा राहिला. ही गोष्‍ट आहे भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत याची. यावेळी ती सांगितली आहे ऋषभ पंतवर उपचार करणारे डॉक्टर दिनशॉ पार्डीवाला यांनी. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय ) पंतच्या पुनरागमनाची कहाणी सांगणारा एक व्‍हिडिओ शेअर केला आहे. या प्रेरणादायी व्‍हिडिओमध्‍ये डॉक्टरांनी ऋषभ पंत याला 'मिरॅकल मॅन' असे संबोधले आहे.  (Rishabh Pant IPL 2024 )

ऋषभच्‍या पुनरागमनाबाबत डॉ. पार्डीवाला होते साशंक

२०२२ मध्‍ये झालेल्‍या भीषण अपघातानंतर गेली दीड वर्ष त्‍याने अतोनात हाल सहन केले. शरीर साथ देत नव्‍हतं;पण तो मनाने हरला नाही. कुबड्या घेवून चालण्‍यापासून मैदानावर पुन्‍हा धावण्‍यापर्यंतचा त्‍याचा हा प्रवास कोणालाही चमत्‍कारापेक्षा कमी वाटणार नाही. . त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर दिनशॉ पार्डीवाला हेही तो पूर्ण बरा होईल का, याबाबत साशंक होते. (Rishabh Pant IPL 2024 )

गुडघ्याचे हाड निखळले होते; ऋषभ म्‍हणाला, मी एक …

डॉक्टर दिनशॉ पार्डीवाला सांगतात, भीषण अपघातात ऋषभच्‍या गुडघ्याचे हाड निखळले होते. म्हणजेच ते जागेवरून घसरले होते. अशा परिस्थितीत हे खूप कठीण आहे, असे मी त्‍याला सांगितले. यावर ऋषभ म्‍हणाला होता की, 'मी एक चमत्कारी माणूस आहे. मला दोनदा गंभीर दुखापत झाली आहे, पण मी बरा झालो आहे. तिसऱ्यांदाही मी नक्कीच बरा होईन'. झालेही तसेच ऋषभ हा 'चमत्कार करणारा माणूस' आहे. व्यावसायिक क्रिकेट खेळण्‍यासाठी मैदानावर उतरतो आहे हा एक चमत्‍कार आहे., असेही पार्डीवाला यांनी म्‍हटलं आहे.

Rishabh Pant IPL 2024 : तो काहीही करू शकतो…

भीषण अपघातानंतर ऋषभला अनेक जखमा झाल्या. गुडघ्याचे एकही हाड योग्य स्थितीत नव्हते.त्याच्या उजव्या गुडघ्यावर लिगामेंटची शस्त्रक्रिया झाली.एवढ्या भीषण अपघातानंतर कोणी पुनरागमन करू शकत असेल तर तो फक्त ऋषभ पंत आहे. ज्या प्रकारची त्याची वृत्ती आहे, तो काहीही करू शकतो. त्याच्या प्रगतीसाठी तो ज्या प्रकारे मेहनत घेत आहे हे खरोखरच कौतुकास्पद आहे, असेही डॉक्टर दिनशॉ पार्डीवाला यांनी म्‍हटलं आहें.

एका दुर्घटनेने एक चांगला माणूस बनवले आहे…

26 वर्षीय ऋषभने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आपली फिटनेस टेस्‍ट दिली. तो फीट असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. अपघातानंतर ऋषभ अधिक मजबूत झाला आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक घटनेचा एक विशिष्ट प्रकारचा परिणाम असतो. मला वाटते की, दुसरे काही नाही तर एका दुर्घटनेने एक चांगला माणूस बनवले आहे. त्याने आपल्या जीवनाचा आदर केला आहे, त्याच्या सभोवतालच्या गोष्टींचा आदर केला आहे. तो अधिक लवचिक आणि मजबूत झाला आहे, असे , NCA मधील कंडिशनिंग तज्ञ निशांत बोरदोलोई यांनी सांगितले.

Rishabh Pant IPL 2024 : ऋषभ पंत आयपीएलमध्ये खेळणार

बीसीसीआयने ऋषभला आयपीएलमध्ये सहभागी होण्यास परवानगी दिली आहे. त्‍याच्‍या नेतृत्त्‍वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघ खेळण्यासाठी सज्ज आहे. दिल्ली संघ 23 मार्च रोजी पंजाब किंग्जविरुद्ध आपला यंदाच्‍या हंगामातील पहिला सामना खेळणार आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news