– हरीष पाटणे
तर मंडळी! उभ्या महाराष्ट्राने पाहिली ना सातारच्या आखाड्यातली कुस्ती दंगल. हलगीचा कडकडाट जसा वाढत होता तसे बाहु स्फुरण पावत होते. तिकडे आखाड्यात कोल्हापूरचा पठ्ठ्या पृथ्वीराज व सोलापूरचा रांगडा विशाल शड्डू ठोकत होते आणि इकडे आखाड्याबाहेरच्या शामियान्यात राजकीय पैलवानही मिशांवर ताव देत होते.
सातारच्या राजकीय कुस्तीच्या आखाड्यात राजे विरूध्द पवार हा सामना तसा पारंपारिकच. सहाजिकच शरद पवार नावाच्या कसलेल्या वस्तादाने राजघराण्याविरोधात कुस्ती करत असलेल्या दीपक पवार, सुधीर पवार या बंधूंना महाराष्ट्र केसरी भरवण्याची संधी दिली. वस्ताद ना आखाड्यात आले ना आखाड्याबाहेरच्या शामियान्यात येवून थांबले. त्यांनी दूर मुंबईतच राहणे पसंद केले. पारंपारिक वैर असल्याने व निमंत्रणही नसल्याने खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले महाराष्ट्र केसरीच्या मैदानात येतीलच याची कुणाला सूत्राम कल्पना नव्हती. पण गर्दीवर स्वार असलेल्या उदयनराजेंनी मोका सोडला नाही. एन्ट्रीलाच टाळ्या वसूल केल्या.
उदयनराजे आखाड्याबाहेरच्या शामियान्यात बसतात ना बसतात तोच अचानकपणे आ. शिवेंद्रराजेही एन्ट्री करतात. दोन्ही राजेंच्या आगमनाने आता आखाड्याबाहेरच्या शामियान्यातही कुस्ती होते की काय? असे 'टाईट' वातावरण झाले खरे! त्यातल्या त्यात आ. शिवेंद्रराजे व दीपक पवार यांची खडाखडी रोजचीच. उठल्या बसल्या सातारा-जावलीत दोघांची खुन्नस सुरू. त्यामुळे कुस्तीच्या मैदानावर पट निघणार की काय? अशी साशंकता बळावलेली.
शामियान्यात आल्या आल्याच उदयनराजेंचा सामना झाला तो राजकीय कुस्तीत त्यांना हरवून खासदारकीची गदा पटकावलेल्या खा. श्रीनिवास पाटील यांच्याशीच पण राजे आणि पाटील असे भेटले की जणू काही एकमेकांना बत्ताशे-लाह्या वाटत आहेत. ना मिशी ताणली गेली, ना तणातणी झाली, दिसली तरी सातारची खिलाडू राजकीय संस्कृती त्यामुळे आखाड्याबाहेरचा हा सामना 'नूरा'च झाला. मग उदयनराजेंनी गाठले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खासदार असताना त्यांची सर्वाधिक बाजू घेणारे आ. शशिकांत शिंदे यांना. राष्ट्रवादीतून भाजपात गेल्यावर उदयनराजे व शशिकांत शिंदे यांच्यात विळ्या-भोपळ्याचे नाते तयार झाले. दोघांमध्येच कुस्त्या सुरू झाल्या. सातारच्या राजकारणाच्या आखाड्यातले कसलेले हे दोन्ही पैलवान मैदानावराच्या लढाईत आपआपल्या प्रतिस्पर्ध्यांकडून चितपट झाले.
त्यांच्या त्यांच्या वस्तादांनी बाहेरची रसद पुरवून त्यांच्यात मुठभर जाण आणली खरी पण मैदानात झालेल्या पराभवाचे शल्य दोघांनाही तितकेच टोचत असलेले. त्यामुळे शशिकांत शिंदेंना पाहताच उदयनराजेंनी त्यांचा दंडच पकडला. दोघांच्याही जवळच्या मित्राने म्हणे लावायची का दोघांच्यातच कुस्ती? असा शामियान्यातच चिमटा लगावला. येणार्या लोकसभेत तसे घडलेच तर नवल वाटायला नको. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दीपक पवार, सुधीर पवार यांच्या बरोबरीने महाराष्ट्र केसरीसाठी परिश्रम घेतले. बाळासाहेबांची स्वारी शामियान्यात असताना उदयनराजेंनी करकचून त्यांचा हातही दाबला. कधी काळी उदयनराजे व बाळासाहेब यांच्यामध्येही राजकीय कुस्ती दंगल झाली होती म्हणे पण त्याचा लवलेशही आखाड्याबाहेरच्या शामियान्यात नव्हता. होती ती जिंदादिल खिलाडूवृत्ती. सुधीर पवारांनी उदयनराजे व शिवेंद्रराजे यांच्यातच कुस्ती लावयाची का?
असा डाव टाकून दोघांचाही पट खोलण्याचा प्रयत्न केला खरा. उदयनराजे तर उठलेही लगेच पण शिवेंद्रराजेंनी चणाक्षपणे हसून डाव उधळून टाकला. त्याचवेळी पारंपारिक राजकीय कुस्ती स्पर्धक असलेले शिवेंद्रराजे व दीपक पवार दिलखुलास भेटलेही. दररोज फुरफुरणारे, गुरगुरणारे, उठा-बशा काढणारे पारंपारिक राजकीय मल्ल हातात हात घेताना दिसले. ना. एकनाथ शिंदे, ना. शंभूराज देसाई यांच्यासमवेत आ. महेश शिंदेही आखाड्याबाहेरच्या शामियान्यात आले. आले ते थेट आ. शशिकांत शिंदे व आ. महेश शिंदे समोरासमोरच कुणी कुठे बसायचे दोघांचीही पंचाईत शेजारी-शेजारी बसावे तर कोरेगावच्या राजकीय आखाड्यात चुकीचा संदेश जायचा त्यामुळे दोघांनी विरूध्द टोकाला जाण्याचाच निर्णय घेतला.
आ. महेश शिंदे व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यातच कानगोष्टी सुरू झाल्या. किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या कुस्ती आखाड्याचा विषय असावा बहुधा! ज्यांच्या ज्यांच्यामध्ये सातारा जिल्ह्याच्या राजकीय आखाड्यात अनेकदा कुस्ती दंगल झाली त्यांची महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात गाठ-भेट झाली. मात्र, ना कुणी खवळला, ना कुणी ढवळला, तिकडे आखाड्यात रोमहर्षक लढत शिगेला पोहचली होती पण इकडच्या आखाड्यात खिलाडूवृत्तीची दंगल सुरू होती. मस्करी, चिमटे यात खरोखरच्या लढाईतले डाव-प्रतिडाव, शह-काटशह विरून जात होते. महाराष्ट्र केसरीचे मैदान पृथ्वीराज पाटील गदागदा हलवत होता. तेव्हा इकडच्या आखाड्यात एकमेकांना टाळ्या देणे सुरू होते. सातारा जिल्ह्याच्या राजकीय आखाड्याची हीच खरी खिलाडूवृत्ती!