पुढारी ऑनलाईन डेस्क : Rinku Singh Record : रिंकू सिंहने गेल्या वर्षात ज्याप्रकारे सर्वांना खेळ केला आहे, त्याने निवड समितीसह अनेक माजी दिग्गज प्रभावित झाले आहेत. धोनीनंतरचा उत्कृष्ट फिनिशर म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. तर दुसरीकडे काहीजण फलंदाजीच्या बाबतीत रिंकूची तुलना माजी खेळाडू युवराज सिंगशी करत आहेत. आशातच आता टी-20 विश्वचषक स्पर्धा जवळ येत आहे. हा मेगा इव्हेंट येत्या जून महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे संयुक्तरित्या आयोजित केला जाणार आहे. दरम्यान, या स्पर्धेसाठी रिंकूचे भारतीय संघातील स्थान जवळपास निश्चित मानले जात आहे.
रिंकूने खालच्या क्रमाने जबाबदारीने फलंदाजी केली आहे. सामना फिनिश करण्याची प्रतिभा असलेल्या फलंदाजाची उणीव टीम इंडियाला भासत होती, जी रिंकूच्या येण्याने नक्कीच निकालात निघाली आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतही रिंकूची अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. तो तिन्ही सामन्यांत नाबाद राहिला. या मालिकेत त्याच्या बॅटमधून एकूण 94 धावा आल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 165 च्या आसपास राहिला. (Rinku Singh Record)
अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात रिंकू फलंदाजीसाठी मैदानात उतरला तेव्हा टीम इंडियाने 22 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या. यानंतर, त्याने कर्णधार रोहितला खंबीर साथ देत आक्रमक फटकेबाजी देखील केली, दोघांच्या विक्रमी भागिदारीचा जोरावर टीम इंडियाची धावसंख्या 212 पर्यंत पोहचली. त्या सामन्यात रिंकूने 39 चेंडूत 2 चौकार आणि 6 षटकारांसह 69 धावांची नाबाद खेळी साकारली. या खेळीसह, तो भारतासाठी टी-20 मध्ये 6 व्या क्रमांकावर सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा खेळाडू बनला. यापूर्वी हा विक्रम अक्षर पटेलच्या नावावर होता, ज्याने 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 65 धावा फटकावल्या होत्या.
रिंकूने 2023 मध्ये पदार्पण केल्यापासून 89 च्या सरासरीने 356 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 89 आहे. त्याच्या बॅटमधून दोन अर्धशकेही झळकली आहेत. या काळात तो 7 वेळा नाबाद राहिला आहे. (Rinku Singh Record)