मंदीचा फटका! राइड शेअरिंग प्लॅटफॉर्म Lyft कडून १,२०० कर्मचाऱ्यांना नारळ

मंदीचा फटका! राइड शेअरिंग प्लॅटफॉर्म Lyft कडून १,२०० कर्मचाऱ्यांना नारळ
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : आर्थिक मंदीमुळे दिग्गज कंपन्यांत नोकरकपात सुरुच आहे. आता उत्तर अमेरिकेतील लोकप्रिय राइड शेअरिंग ॲप Lyft आता १,२०० कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. खर्च कमी करण्याच्या उद्देशाने ही नोकरकपात केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबतचा निर्णय Lyft चे नवनियुक्त सीईओ डेव्हिड रिशर यांनी त्यांच्या पदभार स्वीकारल्याच्या पहिल्या आठवड्यात घेतला आहे. रिशर हे ॲमेझॉनचे माजी एक्झिक्युटिव्ह होते. त्यांनी Lyft च्या स्टेकहोल्डर्सना पाठवलेल्या एका नोटमध्ये नोकरकपातीची घोषणा केली आहे.

त्यांनी म्हटले आहे "मी पुष्टी करत आहे की आम्ही रायडर्स आणि ड्रायव्हर्सच्या गरजा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी रिस्ट्रक्चरिंगचा एक भाग म्हणून टीममधील मनुष्यबळ कमी करु." Lyft ने नेमक्या किती नोकऱ्या कमी केल्या जातील हे स्पष्ट केले नसले तरी किमान १,२०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी केले जाणार असल्याचे वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलने दिले आहे. Lyft मध्ये ४ हजार कर्मचारी काम करत असून यातील ३० टक्के लोकांना कमी केले जाणार आहे.

या कंपनीने यापूर्वी नोव्हेंबरमध्ये ७०० नोकर्‍या कमी केल्या होत्या. हे प्रमाण त्यावेळच्या कर्मचार्‍यांपैकी सुमारे १३ टक्के होते. २०१९ मधील इनिशियल पब्लिक ऑफर म्‍हणजे आयपीओ (IPO) पासून लिफ्टला संघर्ष करावा लागत आहे, तर त्याचा प्रतिस्पर्धी उबेर बाजारातील हिस्सा आणि बाजार भांडवलाच्या बाबतीत पुढे राहिला आहे. लिफ्टचा शेअर सुरुवातील ७२ डॉलरवर होता. आता हे शेअर १० डॉलरपर्यंत खाली आला आहे.

CEO Risher यांनी कंपनीकडे स्पष्ट केले आहे की रायडर्ससाठी उत्तम आणि परवडणारा पर्याय निर्माण करणे आणि ड्रायव्हर्सच्या कमाईत सुधारणा करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

Lyft मधील नोकरकपात ही २०२२ च्या अखेरीस सुरू झालेल्या टेक कंपन्यांच्या नोकरकपात ट्रेंडचा एक भाग आहे आणि हा ट्रेंड नवीन वर्षातही सुरू राहिला आहे. ज्याचा परिणाम Amazon, Google, Microsoft आणि Meta सारख्या कंपन्यांवर होत आहे. लेऑफ ट्रॅकर Layoffs.fyi नुसार, या कंपन्यांनी एकत्रितपणे २०२३ मध्ये सुमारे १ लाख ७२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे.

Lyft, Inc. अमेरिका आणि कॅनडामधील निवडक शहरांमध्ये राइड-हेलिंग, वाहने भाड्याने देणे, मोटोराइज्ड स्कूटर, सायकल शेअरिंग सिस्टम, रेंटल कार आणि फूड डिलिव्हरीची सेवा ऑफर करते.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news