पुढारी ऑनलाईन डेस्क : सीमाप्रश्नावरून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात तणावपूर्ण वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लवकर हस्तक्षेप करून शांततेच्या मार्गाने मार्ग काढावा. राजकारण बाजूला ठेवून काहीतरी मार्ग काढण्याची विनंती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केली. यावर त्यांनी शांततेच्या मार्गाने मार्ग काढला जाईल, असा शब्द दिल्याची माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Maharashtra-Karnataka border row) यांनी आज (दि.९) येथे दिली. मंत्री शहा यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.
खासदार सुळे (Supriya Sule) म्हणाल्या की, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात चिघळलेल्या सीमा प्रश्नात केंद्रीय मंत्री अमित शहा मार्ग काढतील. केंद्राने या प्रश्नात लवकरात लवकर हस्तक्षेप करण्याची विनंती त्यांना केली. कोणताही पक्षपात न करता देशहिताचा निर्णय घेतला जाईल, असा विश्वास शहा यांनी यावेळी दिला आहे. सीमा प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडविण्याचा आमचा आग्रह आहे. यावर मार्ग काढण्याचा शब्द मंत्री शहा यांनी दिला.
सीमाप्रश्नावरून निर्माण झालेल्या सध्याच्या परिस्थितीवर सत्ताधारी खासदारांनी मौन पाळले आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षांना विश्वासात घेत नाहीत. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठोस भूमिका घेत नाहीत, असा आरोप करून राज्य सरकारने सर्वपक्षीयांची बैठक घ्यावी, अशी मागणी सुळे यांनी यावेळी केली. महाराष्ट्रात महापुरूषांचा अवमान होत असताना राज्यातील सरकार असंवदेनशीलपणे वागत आहे. वाचाळवीरांना रोखण्याऐवजी त्यांची पाठराखण केली जात आहे, असा गंभीर आरोप सुळे यांनी करून राज्य सरकारवर हल्ला चढवला.
हेही वाचलंत का ?