पुणे; पुढारी वृत्तसेवा : पतीच्या निधनानंतर जन्मदात्या आईने आर्थिक परिस्थितीमुळे आपल्या आठ वर्षीय मुलाचा सांभाळ करण्यास नकार दिला. आईच्या नकारामुळे त्या चिमुकल्यावर अनाथाश्रमात जायची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, याची माहिती मिळताच सावत्र आईने मुलाचं पालकत्व मिळावं म्हणून थेट न्यायालयात धाव घेतली अन् पालकत्व मिळवलंही. नात्यामध्ये 'सावत्र' हा शब्द आला की त्यामध्ये दुरावा, कडवडपणा, द्वेष हीच भावना सर्रास दिसून येते. मात्र, शहरातील एका आईने या भावना पूर्णपणे खोट्या ठरवत नि:स्वार्थी प्रेम आणि उत्तुंग माया ही आईच देऊ शकते, हे दाखवून दिले.
शहरातील वीरेंद्र सिंग (सर्वांची नावे बदललेली आहेत) या उच्चशिक्षित शासकीय अधिकार्याने लग्नाच्या वीस वर्षांनतर पहिली पत्नी शारदा सिंग यांच्यापासून घटस्फोट घेत पामेला सिंग यांच्याशी दुसरा विवाह केला. या वेळी, वीरेंद्र यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुली होत्या, तसेच त्या परदेशात उच्च शिक्षण घेत होत्या. दुसर्या लग्नानंतर वीरेंद्र यांना एक मुलगा झाला.
लग्नानंतर वीरेंद्र यांचे पामेला यांच्याशी वाद होऊ लागले. त्यानंतर त्यांनी पामेला यांच्यापासून विभक्त होत पुन्हा शारदा यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली. या दरम्यान, चेतन हा आठ वर्षांचा होता तसेच तो पाचगणी येथे शिक्षण घेत होता. वीरेंद्र यांची बदली आयआयटी भागलपूर येथे झाली. अवघ्या एक महिन्यातच कोरोनाच्या आजाराने त्यांचा मृत्यू झाला.
वीरेंद्र यांच्या अकाली मृत्यूने त्या मुलाचा पाचगणीच्या शाळेतील प्रवेश रद्द करून घ्यावा लागला. दरम्यान, शारदा व त्यांच्या मुलींनी चेतन यास पळवून नेलेले असून, त्याचा ताबा देण्याची मागणी पामेला यांनी पोलिसांकडे तक्रारीद्वारे केली. शारदा यांनी चेतन याचा ताबा पामेला यांच्याकडे देण्याची तयारी दर्शविली.
परंतु, पामेला हिने आर्थिक कारण देत चेतनची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे त्या मुलाला अनाथाश्रममध्ये टाकण्याची वेळ आली; परंतु सावत्र आईने स्वतःहून सदर मुलाचं पालकत्व स्वीकारण्याची जबाबदारी घेऊन त्याबाबत त्या मुलाचे पालकत्व मिळावे म्हणून अॅड. हेमंत झंजाड यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला.
शारदा यांनी चेतन याचा सांभाळ करण्यास सक्षम असल्याचे पुरावे न्यायालयात सादर केले. तसेच, पामेला यांनीही न्यायालयात हजर राहत मुलाचा सांभाळ करण्यास असमर्थता दर्शवून शारदा यांना मुलाच्या संपूर्ण संगोपनाची जबाबदारी देण्यास मान्यता दिली. त्यानंतर न्यायालयाने युक्तिवाद मान्य करून व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चेतनच्या संगोपनाची जबाबदारी सावत्र आईस दिली आहे.
– अॅड. हेमंत झंजाड, शारदा यांचे वकील.