साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची शिफारस

साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची शिफारस

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भारतीय राज्यघटनेचे जनक आणि महान समाजसुधारक, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित दोन स्थळांना राष्ट्रीय महत्वाची स्मारके म्हणून घोषित करण्याची शिफारस राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने केली आहे. भीमराव रामजी आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी त्यांचे प्राथमिक शिक्षण घेतले त्या साताऱ्यामधील प्रतापसिंह हायस्कूलला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची शिफारस प्राधिकरणाने केली आहे.

येथील शाळेने शाळेची नोंदवही अजूनही अभिमानाने जपून ठेवण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थी म्हणून भीमराव यांच्या मराठीतून केलेल्या स्वाक्षऱ्या आहेत. सध्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या या शाळेची दूरवस्था झाली आहे. २३ सप्टेंबर १९१७ रोजी डॉ.आंबेडकरांनी जिथे अस्पृश्यता निर्मूलनाचा संकल्प केला होता ते वडोदरा येथील 'संकल्प भूमी वटवृक्ष' परिसर स्थळ ही महत्त्वाची ठिकाणे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावी, अशी शिफारसदेखील प्राधिकरणाने केली आहे.

हे ठिकाण शंभर वर्षांहून अधिक जुने असून, डॉ.आंबेडकरांनी सुरु केलेल्या सामाजिक सन्मानाच्या क्रांतीचे ते साक्षीदार असल्याने ही मागणी करण्यात आली आहे. या शिफारशी राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने संस्कृती राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्यासमोर सादर केल्या आहेत. सामाजिक समरसता आणि समतेच्या क्षेत्रातील हा एक अमूल्य वारसा आहे आणि राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित करून त्याचे जतन केले पाहिजे, असेही राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाचे अध्यक्ष तरुण विजय यांनी सांगितले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news