कोल्हापूर : अधिक मासात रेडिमेड अनारसे विक्री 2 टन

रेडिमेड अनारसे
रेडिमेड अनारसे

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : लक्ष्मीनारायणसम जोडी म्हणून अधिक मासाच्या महिन्यात मुलगी आणि जावयाला घरी बोलावून त्यांचा योग्य तो सन्मान केला जातो. त्यांना स्वादिष्ट जेवणाची मेजवानी खाऊ घातली जाते. बदलत्या काळानुसार आता जावयांना रेडिमेड पदार्थ खायला दिले जातात. यंदा जावयाच्या मानात शहरात दोन टनांवर रेडिमेड अनारसे यांची विक्री झाली आहे. यासोबतच म्हैसूरपाक आणि पारंपरिक धोंड्यांची विक्री साधारण 1 ते दीड टनांवर झाली आहे. याशिवाय बत्ताशांनाही विशेष मागणी असल्याचे बाजारात पाहायला मिळते.

नव्या जमान्यात या लक्ष्मीनारायणाच्या जोडीला थेट हॉटेल, रेस्टॉरंटमध्येच बोलावले जात आहे. एवढेच नाही तर रेडिमेड आणलेले आणि आकर्षकरीत्या सजवलेले 33 अनारसे, म्हैसूरपाक आदी मिष्ठान्ने दिले जात आहेत. काही घरांमध्ये आजही मोठ्या थाटात जावयाचे कौतुक करण्यासाठी आयोजन केले जात आहे. लाडकी लेक आणि जावयासाठी खुसखुशीत साजूक तुपातील किंवा खाद्यतेलात तळलेले अनारसे, पूरण घालून तयार केलेले धोंडे हौसेने तयार करणार्‍यांत सुगरणी सासू मग्न आहेत. मात्र, काही कुटुंबांत नवरा-बायको दोघेही नोकरदार असल्याने त्यांना घरी अनारसे, धोंडे करण्यास वेळे मिळत नाही. अशा कुटुंबांसाठी किंवा ज्यांना अनारसे, धोंडे व्यवस्थित करता येत नाहीत, अशांसाठी रेडिमेडचा आधार आहेच, यात बहुसंख्य जावईबापू मात्र खूश आहेत.

अनारसे, म्हैसूरपाक, पारंपरिक पद्धतीने बनवलेले धोंडे हे जास्त दिवस टिकत नाहीत. रेडिमेडमध्ये खोबरे, पिठी साखर, वेलची घालून तयार केलेले पदार्थ थोडे जास्त दिवस टिकतात. साधारणतः 300 रुपयांपासून हे पदार्थ बाजारात उपलब्ध झाले आहेत.

महिलांना मिळाले हंगामी काम

शहरात 150 पेक्षा अधिक महिला अनारसे, धोंडे बनवणे व ते विक्री करण्याचा घरगुती व्यवसाय करत आहेत. काहींनी तर सोशल मीडियावर याची माहिती टाकत व्यवसाय सुरू केला आहे. त्यामध्ये आता बचत गटांच्या महिलांनीही सहभाग वाढवला असून या महिलांकडून शहरातील दुकानदार अनारसे, धोंडे खरेदी करून त्यांना प्रोत्साहन देत असल्याची माहिती आशा पाटील यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news