पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तान राष्ट्रीय संसद आणि प्रांतीय विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेले नसल्याने सत्तासंघर्षाचा तिढा कायम राहिला आहे. इम्रान खान समर्थक अपक्ष उमेदवारांनी 93 जागांसह आघाडी घेतली आहे. आता सत्ता स्थापनेसाठी ७५ जागा जिंकलेल्या नवाझ शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) (पीएमएलएन) आणि ५४ जागांवर समाधान मानाव्या लागलेल्या बिलावल भुट्टो यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांनी देशाला राजकीय अस्थिरतेपासून वाचवण्यासाठी आघाडी सरकार स्थापन्यासाठी चर्चा सुरु केली आहे. तर इम्रान खान यांचा पक्षाचे समर्थक अपक्ष उमेदवारांनी विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे तेहरिक-ए- इन्साफचे अध्यक्ष गौहर अली खान यांनी स्पष्ट केले आहे.
आमच्या पक्षाकडे बहुमत आहे. मात्र याचा सन्मान करण्यात आला नाही. आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण देणे गरजेचे होते. राष्ट्रीय संसदेतील ७० जागांचे निकाल हे वादात आहेत याची निवडणूक आयोगाने चौकशी करावी, अशी मागणी करत आमचा पक्ष सरकार स्थापन करण्याच्या तयारीत नाही. आम्ही विरोधी पक्ष म्हणून भूमिका बाजवू, असे एका मुलाखतीवेळी गौहर अली खान स्पष्ट केले. तसेच कोणत्याही परिस्थितीत पक्ष नवाज शरीफ आणि बिलावल भुट्टो यांच्या पक्षांबरोबर युती करणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
सहा अपक्ष उमेदवार नवाझ शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) (पीएमएलएन) मध्ये सहभागी होणार असलर्याचे जाहीर केले आहे. इम्रान खान यांच्या पक्षाला सत्ता स्थापने एवढे संख्याबळ नसल्याने हा निर्णय घेतला असल्याचे या उमेदवारी जाहीर केले आहे. नवाझ शरीफ आणि बिलावल भुट्टो यांचा पक्ष अपक्ष उमेदवारांना आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आतापर्यंत, लाहोरमधील इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचे समर्थित विजयी उमेदवार वसीम कादिर यांच्यासह सहा अपक्ष निवडून आलेले उमदेवार 'पीएमएलएन'मध्ये सहभागी झाले आहेत. मी माझ्या घरी परतलो आहे, माध्यमांशी बोलताना वसीम कादिर यांनी सांगितले.
पाकिस्तान मुस्लीम लीग (एन) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी यांच्यात राजकीय सहकार्यावर तत्त्वत: एकमत झाले. बैठकीत देशाची एकूण परिस्थिती आणि भविष्यातील राजकीय सहकार्य यावर सविस्तर चर्चा झाली. नेत्यांनी राजकीयदृष्ट्या सहकार्य करण्यावर सहमती दर्शवली. देशाला राजकीय स्थैर्य प्राप्त होईल, असे नवाझ शरीफ यांच्या पक्षाने एका निवेदनात म्हटले आहे.
कराचीमधील मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (एमक्यूएम) पक्षानेही यंदाच्या निवडणुकीत लक्षवेधी कामगिरी केली. या पक्षाच्या १७ उमेदवारांचा विजय झाला आहे. सत्ता स्थापनेसाठी या पक्षाने नवाझ शरीफ यांच्याशी चर्चा केली आहे. या पक्षाचा निर्णयही पाकिस्तानातील पुढील सरकारचे भवितव्य ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पाकिस्तान राष्ट्रीय संसदेमध्ये ( नॅशनल असेंब्ली ) बहुमत सिद्ध करण्यासाठी १६९ संख्याबळ आवश्यक आहे.