पुढारी ऑनलाईन डेस्क : रविचंद्रन अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अप्रतिम कामगिरी केली. त्याने या मालिकेतील 5 सामन्यात एकूण 26 विकेट्स घेऊन मालिका जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. टीम इंडियाने गेल्या दशकात घरच्या मैदानावर वर्चस्व गाजवले आहे. भारताने शेवटची कसोटी मालिका 2012 मध्ये इंग्लंडविरुद्ध मायदेशात गमावली होती. अश्विन गेल्या 12 वर्षांत घरच्या मैदानावर टीम इंडियासाठी सर्वात मोठा मॅचविनर ठरला आहे. इंग्लंडविरुद्धची पाचवी कसोटी हा अश्विनचा शंभरावा कसोटी सामना होता. या सामन्यात अश्विनने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. 147 वर्षांच्या क्रिकेटच्या इतिहासात जे कुणा गोलंदाजाला जमले नाही ते त्याने करून दाखवले आहे.
रविचंद्रन अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात चार तर दुसऱ्या डावात 5 बळी घेतले. अश्विनने 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्यावेळी पदार्पणातच त्याने पाच विकेट्स घेतल्या. कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या जुन्या इतिहासात पदार्पणाच्या सामन्यात आणि 100 व्या सामन्यात 5 बळी घेणारा अश्विन पहिला खेळाडू ठरला आहे.
आर अश्विनने मायदेशात इंग्लंडविरुद्ध कसोटीत 100 बळी पूर्ण केले आहेत. मायदेशात इंग्लंडविरुद्ध 100 कसोटी बळी घेणारा तो पहिला खेळाडू ठरला. याशिवाय घरच्या मैदानावर कोणत्याही संघाविरुद्ध 100 बळी घेणारा तो पहिला आणि एकूण तिसरा गोलंदाज आहे. स्टुअर्ट ब्रॉडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात 106 विकेट घेतल्या आहेत. तर जेम्स अँडरसनने मायदेशात भारताविरुद्ध 105 विकेट्स घेतल्या आहेत.
अश्विनची गणना जगातील महान गोलंदाजांमध्ये केली जाते. त्याने भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. भारतासाठी 100 कसोटी सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 516 विकेट्स जमा झाल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने 500 बळी पूर्ण केले. शिवाय धर्मशाला येथील सामन्यात त्याने कसोटीत कारकिर्दीत 36 वेळा पाच फलंदाजांना बाद करण्याची किमया केली.