पुढारी ऑनलाईन डेस्क : Ravi Shastri : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. इंग्लंडमधील ओव्हल येथे 7 जूनपासून हा सामना खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाने यासाठी आधीच संघ जाहीर केला असून मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीनेही 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली.
जानेवारी 2022 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळलेल्या अजिंक्य रहाणेचे भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. त्याने तब्बल दीड वर्षानंतर भारतीय कसोटी संघात कमबॅक केले आहे. या सामन्याच्या निवडीसाठी श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत उपस्थित नव्हते. अय्यर आणि बुमराह यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्या आहेत, ज्यातून दोघेही बरे होत आहेत, तर पंत कार अपघातात जखमी झाल्याने तो बराच काळ संघाबाहेर असणार आहे. अशा स्थितीत रहाणेचे मधल्या फळीत परतणे टीम इंडियासाठी चांगले संकेत आहेत. टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि क्रिकेटर रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनीही या निवडीचे समर्थन केले आहे.
शास्त्रींनी (Ravi Shastri) ट्विटवरून एक फोटो शेअर केला आहे. त्यावर चाहत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. खरंतर या फोटोत कर्णधार रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकूर आणि चेतेश्वर पुजारा दिसत आहे. या फोटोत विराट कोहली दिसत नसल्याने चाहते नाराज झाले आहेत. शिवाय काही चाहत्यांनी शास्त्री यांच्यावर आरोपच्या फैरी झाडल्या आहेत. शास्त्रींनी शेअर केलेल्या फोटोत पुजारा सोडला तर फक्त मुंबईकर खेळाडू दिसत आहेत. उत्तर भारतातील खेळाडू फोटोत का नाही नाही, असा सवाल नेटक-यांनी उपस्थित केला आहे. पण काहींनी असे प्रश्न निराधार असल्याचे म्हणत शास्त्री आणि विराट कोहली यांच्यातील केमिस्ट्री विषयी भाष्य केले आहे.
रोहित, रहाणे, शार्दुल आणि पुजारा यांचा एकत्र फोटो शेअर करत शास्त्री (Ravi Shastri) यांनी म्हटलं की, 'सर्वोत्कृष्ट भारतीय संघाची निवड झाली आहे. संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांचे अभिनंदन. भारतीय संघाने अलीकडेच ऑस्ट्रेलियाचा बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत 2-1 असा पराभव केला आहे. आता इंग्लंडच्या मैदानावर टीम इंडिया वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाला असून डब्यूटीसीचे जेतेपद पटकावतो का हे पाहावे लागेल.'