अमरावती, पुढारी वृत्तसेवा: नवनीत राणा यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर त्यांचे पती आमदार रवी राणा हे देखील भाजपमध्ये जाणार का, असा प्रश्न आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे उपस्थित केला जात आहे. Ravi Rana join BJP
एक दिवस आमदार रवी राणा हे देखील भाजपमध्ये प्रवेश करतील, असे बावनकुळे हे अमरावतीत म्हणाले आहेत. आज तरी रवी राणा हे युवा स्वाभिमान पक्षामध्ये आहे. पण आमची त्यांना विनंती राहील, त्यांनी कधीतरी विचार करावा आणि भारतीय जनता पार्टीमध्ये यावं. मात्र शेवटी निर्णय त्यांना करायचा आहे, असेही बावनकुळे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपची संवाद बैठक सोमवारी (दि.१)हॉटेल प्राईम पार्क येथे पार पडली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. Ravi Rana join BJP
दरम्यान नवनीत राणा यांच्या उमेदवारीला घेऊन भाजपमध्ये अनेकांचे नाराजी आहे, याबाबत बावनकुळे यांना विचारले असता त्यांनी कोणाचीच नाराजी नसल्याचे सांगितले.
नवनीत राणा यांच्या उमेदवारीला एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह सर्व घटक पक्षाच्या 11 जणांनी मान्यता दिली आहे. नवनीत राणा भाजपच्या अधिकृत उमेदवार आहे. नवीन उमेदवार असल्यास थोडी नाराजी असतेच. आपल्यालाच उमेदवारी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण शेवटी एकावेळी एकच जण लढू शकतो. नवनीत राणा यांच्या उमेदवारीला घेऊन आता कोणीच नाराज नसल्याचे बावनकुळे म्हणाले.
महायुतीचे सर्व उमेदवार लवकरच जाहीर होतील. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमेकांना विश्वासात घेऊन काम करत आहेत, असेही ते म्हणाले.
दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी प्रहार चे उमेदवार दिनेश बुब यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या संदर्भात बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले की, आनंदराव अडसूळ यांचा मानसन्मान आमचे केंद्रीय नेतृत्व राखेल. त्यांची समजूत काढली जाईल. शिंदे गटात असलेले आनंदराव अडसूळ आणि अभिजीत अडसूळ हे दोन्ही पिता-पुत्र नवनीत राणा यांच्या भाजप उमेदवारी विरोधात आहेत.
Ravi Rana join BJP : माझ्या त्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला
नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल सुप्रीम कोर्टाकडून अद्याप आलेला नाही. तरी देखील भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. या संदर्भात नागपुरात बोलताना बावनकुळे हे त्यांचा निकाल लागला असल्याचे म्हणाले होते. अमरावतीत त्यांना याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. आतापर्यंतचे निकाल तपासून बघा असे मी म्हणालो होते आणि पुढे निकालाची वाट बघावी असेही म्हणालो होतो. कोणी विपर्यास करत असेल तर मी काही बोलू शकत नाही.
बच्चू कडू आणि भाजपचा संबंध नाही
महायुतीचे घटक असलेले प्रहार चे प्रमुख बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभेत स्वतंत्र उमेदवार दिला आहे. या संदर्भात बोलताना बावनकुळे म्हणाले की बच्चू कडू यांचा वेगळा पक्ष आहे. त्यांचा तो निर्णय घेण्याचा अधिकार आहे. ते एकनाथ शिंदे यांच्या महायुतीमध्ये आहेत. त्यांचा आमच्याशी थेट संबंध नाही. त्यांचा तिढा एकनाथ शिंदेच सोडवतील.