अमरावतीत महायुतीत फूट? नवनीत राणांचा प्रचार करण्यास बच्चू कडूंचा नकार | पुढारी

अमरावतीत महायुतीत फूट? नवनीत राणांचा प्रचार करण्यास बच्चू कडूंचा नकार

अमरावती – पुढारी वृत्तसेवा : प्रचंड विरोध असताना देखील भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्याने अमरावतीत महायुतीत फूट पडल्याचे चित्र आहे. महायुतीचे घटक असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह ‘प्रहार’चे आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांचा प्रचार करण्यास नकार दिला आहे. राणा यांच्या विरोधात जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची मोट बांधून त्यांना या निवडणुकीत कसे पाडता येईल, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. स्थानिक भाजपचे नेते देखील नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. हा विरोध डावलून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने नवनीत राणा यांना अमरावती लोकसभेत उमेदवारी दिल्यामुळे स्थानिक भाजपचे पदाधिकारी देखील नाराज आहेत. त्यामुळे नवनीत राणा यांची वाट या लोकसभेत बिकट असल्याचे चित्र आहे. आता भाजप समोर विरोधी पक्षाच्या उमेदवारापेक्षा अंतर्गत विरोधाचे मोठे आव्हान आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांचे अपवाद वगळता कुणासोबतच सलोख्याचे राजकीय संबंध नाहीत. महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि प्रहारसह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजय खोडके हे देखील नवनीत राणा यांचे राजकीय वैरी आहेत. विशेष म्हणजे भाजपमधील अनेकांना डावलून नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्याने त्यांची नाराजी भाजपने ओढवून घेतली आहे.

एवढी लाचारी कोणावरही येऊ नये – बच्चू कडू

ज्या राणा यांनी भाजपचे कार्यालय फोडले. कार्यकर्त्यांना मारहाण केली. पालकमंत्री नाही तर बालकमंत्री आहे, असं हिणवलं. आता त्या कार्यालय फोडणाऱ्याचे झेंडे भाजप कार्यकर्त्यांना हाती घ्यावे लागत आहे. एवढी लाचारी कोणावरही येऊ नये, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांच्या भाजप उमेदवारीवर बच्चू कडू यांनी दिली आहे.

भाजप कार्यकर्त्यांचा स्वाभिमान वरिष्ठ नेत्यांनी ठेवला नाही. आमची स्वतःची पान टपरी आहे. आम्ही कुठेही जाणार आणि कुठेही लावणार. पण ज्यांनी भाजप मोठी केली. प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. असे कितीतरी एससी मधील कार्यकर्ते भाजपमध्ये आहेत. त्यांना काय मिळालं. भाजप सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी नाही तर त्यांच्यावर लाचारीची वेळ भाजपने आणली आहे. हा निर्णय म्हणजे आमच्यासाठीच नाही तर भाजप कार्यकर्त्यांसाठीही मोठा घात आहे. त्यामुळे आता कोण निवडून येणार, याच्यापेक्षा कोणाला पाडायचं हे निश्चित झालं पाहिजे, असेही कडू म्हणाले.

पक्ष जेव्हा कार्यकर्त्यांचा विचार करत नाही तेव्हा कार्यकर्त्यांनीही काही वेळासाठी पक्षाचा विचार करू नये असा सल्ला देखील बच्चू कडू यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे. कुठल्याही परिस्थितीत नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका देखील बच्चू कडू यांनी घेतली आहे. अचलपूर आणि मेळघाट असे दोन मतदारसंघ जिल्ह्यात बच्चू कडू यांच्या प्रहार कडे आहे.

ही राजकीय आत्महत्या – आनंदराव अडसूळ

नवनीत राणा यांच्या सगळे विरोधात आहेत. आमदार बच्चू कडू, राजकुमार पटेल, खोडके यांच्यासह स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचा देखील विरोध असताना नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे हा निर्णय का घेण्यात आला हे कळायला मार्ग नाही. हा निर्णय म्हणजे राजकीय आत्महत्या आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिली आहे.

भाजपचे स्थानिक पदाधिकारी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि त्यांनी देखील नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यास आम्ही काम करणार नाही, असे स्पष्ट सांगितले आहे. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झाली आहे. निकाल केव्हाही येऊ शकतो. त्यामुळे उमेदवारी देताना याचे भान ठेवायला पाहिजे होते, असेही अडसूळ म्हणाले.

मी लोकशाही मानणाऱ्यापैकी आहे. नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, ही महायुतीची उमेदवारी आहे किंवा नाही हे बघावे लागेल, असे सांगत अडसूळ यांनी आपण अमरावती लोकसभा मतदारसंघातून वेळ पडल्यास अपक्ष उमेदवारी दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अमरावतीच्या जागेवरून महायुतीमध्ये फूट पडल्याचे अमरावतीत चित्र आहे.

Back to top button