रत्‍नागिरी : देवरूख मुख्य बाजारपेठेत तीन दुकाने जळून खाक

दुकाने जळून खाक
दुकाने जळून खाक

देवरुख ; पुढारी वृत्तसेवा – शहरातील मुख्य बाजारपेठेतील तीन दुकाने शॉर्टसर्किटमुळे आग लागून खाक झाली. ही घटना (रविवार) मध्यरात्री घडली. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले. अयंगार बेकरी मधील डि फ्रीजरमधील बिघाडामुळे आग लागली. नागरिकांच्या सर्तकतेमुळे बेकरी मधील दोन जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. त्‍यामुळे पुढील अनर्थ टळला. या भीषण आगीत येथील अयंगार बेकरी, भाजी दुकान व किराणामालाचे दुकान गोडाउनसह खाक झाले. महावितरणने हि आग बेकरी मधील डि फ्रीजरमधील शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवता आहे.

आग लागण्याची घटना रविवारी रात्री १२. ३० वाजण्याच्या सुमारास घडली. साडवली व देवरुख येथे सांस्कृतिक कार्यक्रम सुरु असल्याने नागरिकांनी वर्दळ बाजारपेठेतून होती. नागरिक आग लागल्याचे समजताच आग विझवण्यासाठी प्रयत्न करु लागले. मात्र बेकरी मधील तेलकट व तुपकट पदार्थ व त्यांचे तेलयुक्त साहित्य व फर्निचर याने तात्काळ पेट घेतला आ‍णि आगीने रौद्ररुप धारण केले.

माजी नगराध्यक्ष अभिजीत शेट्ये व सहकारी व नागरिक यांनी पाणी, माती यांचा वापर करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीने बघता बघता कडेला असलेल्या भाजी दुकानातील प्लॅस्टीक क्रेट यांनीही पेट घेतला. यातून आगीच्या ज्वाळा प्रविण पागार यांच्या किराणा दुकानाकडे वळल्या. दुकानातील तेल कॅन व किराणा मालही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यात दुकानामागील गोडाऊनही आगीच्या ज्वाळात गेले.आग नजीकच्या अबीर मेडिकलमध्ये जाऊ नये यासाठी नागरिकांनी किराणा दुकानाचे व मेडिकलचे छप्पर उडवले अन आग तीन दुकानापुरतीच राहिली.

बेकरीचे मालक अंब्रीश चौधरी व त्यांचा कामगार आगीवेळी बेकरीतच होते. नागरिकांनी बेकरीच्या मागील खिडकी तोडून या दोघांना सुखरुप बाहेर काढले. भाजी दुकान हे दीपक येडगे यांचे होते. या दुकानातील कॅश सुमारे २२ हजार व महत्त्वाचे मूळ कागदपत्रे या आगीत जळून खाक झाली आहेत. भाजी दुकानाचे शटर, छप्पर व आतील साहित्य, तसेच बेकरी मधील आवश्यक सर्व विद्युत उपकरणे, यात फ्रीज, डी फ्रीजर, मिक्सर, पीठ मळणी यंत्र यांसह तयार पदार्थ व सर्व फर्निचर आगीत भस्मसात झाले. आग लागली असताना बेकरीतून मोठ्या प्रमाणात आवाज होत होते. हे विद्युत उपकरणातील कॉईल व कुलर यांचे असल्याचे घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी सांगितले.

सहा महिन्यांपूर्वीच प्रविण पागार यांनी सदर दुकान विकत घेवून व्यवसाय सुरु केला होता. नागरिकांनी आग आणखीन पसरु नये म्हणून तेलाचे कॅन बाहेर काढण्याचे काम केले. मात्र आग मोठी असल्‍याने उर्वरित माल वाचवता आला नाही. यामुळे पागार यांचे मोठे नुकसान झाले. देवरूख नगरपंचायतीला अग्‍नीशमन बंब मंजूर झाला आहे, मात्र तो अजुन मिळलेला नाही. त्‍यामुळे त्‍याचा फटका आगीच्या घटनेवेळी मालमत्‍तांना बसतो. याचा नागरिकांमधून रोष व्यक्‍त करण्यात येत आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news