रत्नागिरी : बहिणीची छेड काढल्याच्या रागातून एकाचा खून; मालवण येथील चौकेतील घटना

रत्नागिरी : बहिणीची छेड काढल्याच्या रागातून एकाचा खून; मालवण येथील चौकेतील घटना

Published on

मालवण : पुढारी वृत्तसेवा : बहिणीची छेड काढल्याच्या रागातून केलेल्या मारहाणीत बोर्डवे-सुंदरवाडी येथील दीपक वामन येंडे (वय 56, सध्या रा. कट्टा, ता. मालवण) यांचा मृत्यू झाला. मृत दीपक यांचा भाऊ संतोष वामन येंडे (52, रा. बोर्डवे-सुंदरवाडी) यांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी संशयित गणेश गावडे (35), अनाजी गावडे (40) यांच्यासह आणखी एक अनोळखी अशा तिघांवर मालवण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शनिवारी रात्री 11 वाजता चौके भराडी मंदिरानजीक माळरानावर घडली. तिघाही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे.

संतोष येंडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी माझी पत्नी सुजाता, आई जयवंती, मुलगा विराज, मुलगी तन्वी, तसेच माझा मोठा भाऊ सखाराम, त्याची पत्नी व मुलगा अशी बोर्डवे येथे एकत्र कुटुंबात राहतो. माझा दोन नंबरचा भाऊ दीपक वामन येंडे हा कट्टा एसटी स्टँडचे पाठीमागे सध्या एकटाच भाड्याने राहण्यास आहे. त्याचे चौके बाजार येथे बांगडी विकण्याचे दुकान आहे. त्याची पत्नी दोन वर्षांपूर्वी मयत झालेली आहे. त्याची मोठी मुलगी प्रियंका येंडे ही पतीसह नालासोपारा येथे राहते. तसेच लहान मुलगी प्राजक्ता ही प्रियंकाकडे राहते.

8 एप्रिल रोजी घरी जाताना रात्री 10.47 वा.पुतणी प्रियांका हिचा माझ्या मोबाईलवर फोन आला. तिने पप्पांना कोणीतरी चौके येथे मारत आहे, तुम्ही ताबडतोब तेथे जा, असे सांगितले. त्यावर मी तिला कोण मारत आहे, असे विचारले असता गणेश गावडे नामक कोणीतरी व्यक्ती आहे, असे त्याने पप्पांच्या मोबाईलवरून फोन करून सांगितले आहे. त्यानंतर मी भाऊ दीपक याच्या मोबाईलवर कॉल केला असता संबंधिताने फोन उचलला. मी त्याला काय झाले असे विचारले असता त्याने तुमचा भाऊ जिवंत हवा असेल तर ताबडतोब या, असे सांगितले. फोन चालू असताना सोडू नको, असे बोलण्याचा आवाज येत होता. त्यावर मी त्याला कुठे यायचे, असे विचारले असता त्याने कुपेरीची घाटी चढल्यावर फोन करा, कुठे यायचे ते मी तुम्हाला सांगतो. मी त्यांना विनंती केली तुम्ही दीपकला मारू नका मी लगेच निघतो, असे सांगितले.

त्यानंतर मी, भाऊ सखाराम, त्यांचा मुलगा रोहित, पत्नी सुजाता व मुलगा विराज व शेजारी राहणारा चुलत भाऊ विठ्ठल बाळकृष्ण येंडे यांना याची माहिती दिली. त्यानंतर गाडी करुन रात्री 11 वा.च्या सुमारास मी, चुलत भाऊ विठ्ठल येंडे, पुतण्या रोहित चौके येथे जाण्यास निघालो. आम्ही कसाल मार्गे कुपेरीची घाटी चढल्यानंतर भाऊ दीपक याच्या मोबाईलवर फोन केला परंतु फोन लागला नाही म्हणून आम्ही चौके बाजारात गेलो. त्यानंतर परत फोन लावला त्यावेळी त्याच व्यक्तीने फोन उचलला व आम्हाला पुन्हा माघारी यायला सांगून भराडी मंदिराजवळ आला की गाडी स्लो करा मी रोडवर थांबतो, असे सांगितले. त्यानुसार भराडी मंदिराच्या पुढे 100 मीटर अंतरावर एक जण रस्त्यावर थांबलेला दिसला. तिथे भाऊ दीपक रक्तबंबाळ झालेला दिसला. रस्त्यावर आलेल्या व्यक्तीसोबत अन्य दोघे अनोळखी तिथे होते. यावेळी ते तिघेही दीपक याला शिवीगाळ करत होते. मी त्यांना काय झालं म्हणून विचारल्यावर त्यांच्यापैकी एकाने तुझा भाऊ माझ्या बहिणीची छेड काढतो, त्यामुळे त्याला प्रसाद दिला आहे. तो परत इकडे दिसला तर त्याला जिवंत ठेवणार नाही, असे म्हणत दीपक याच्या केसाला धरून हाताच्या थापटाने दोन वेळा थोबाडीत मारले. तर दुसर्‍या एकाने दीपकच्या कमरेवर लाथा मारल्या. त्यावर पुतण्या रोहित याने त्यांना मारण्यापासून अडविले. त्यावेळी त्यांच्यापैकी एक जण गणेश गावडे याला सोडू नको, असे म्हणत होता. मी त्या दोघांना त्यांचे नाव विचारलं असता एकाने त्याचे नाव अनाजी गावडे, असे सांगितले परंतु तिसरा नाव सांगायला तयार नव्हता. आम्ही सर्व जण त्यांना दिपक याला मारू नका, अशा विणवण्या करून त्या तिघांच्या तावडीतून सोडवून दिपक याला आमच्या गाडीत घातले. त्याला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास मालवण पोलिस करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news