रत्नागिरी : आंबा बागायतदारांचे हिवाळी अधिवेशनापूर्वी उपोषणाचे हत्यार

रत्नागिरी : आंबा बागायतदारांचे हिवाळी अधिवेशनापूर्वी उपोषणाचे हत्यार
Published on
Updated on

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : शासन कोकणातील आंबा बागायतदारांकडे पाहिजे त्याप्रमाणे लक्ष देत नाही, येथील आंबा बागायतदारांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. त्यामुळे आता आक्रमकपणे रस्त्यावर उतरण्याचा निर्णय बागायतदारांनी घेतला आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी उपोषणाचे हत्यार उपसले जाणार असल्याचा इशाराच आंबा बागायतदारांनी दिला आहे.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत आंबा बागायतदारांनी आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी आंबा बागायतदार प्रकाश साळवी, प्रदीप सावंत, शेतीतज्ज्ञ अ‍ॅड. ज्ञानेश पोतकर, रामचंद्र मोहिते, नरेंद्र रसाळ, सुधीर देवळेकर, दिनेश भडवळकर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

आंबा बागायतदारांना 2015 मध्ये मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. यावेळी कर्जाच्या तीन महिन्यांच्या व्याजाचा परतावा देण्याची घोषणा शासनाने केली होती. मागील आठ वर्षांत त्यातील एकही पैसा मिळाला नाही. वारंवार मागण्या, आंदोलन केल्यानंतर सुमारे 12 हजारांहून अधिक आंबा बागायतदारांची यादी तयार करण्यात आली. त्यातील आतापर्यंत फक्त 78 जणांना व्याजाचा परतावा देण्यात आला आहे. आंबा शेतकर्‍यांची ही एक प्रकारची चेष्टाच असल्याचे प्रदीप सावंत यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्वच आंबा शेतकर्‍यांना याचा लाभ मिळाला पाहिजे असे मत यावेळी प्रकाश साळवी यांनी मांडले.

पालकमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली. परंतु त्यातून प्रश्नांचा निपटारा झालेला नाही. आंबा शेतकर्‍यांना तुडतुड्याचा त्रास मागील काही वर्ष सातत्याने जाणवत आहे. यावर ठोस उपाय काढण्यात विद्यापीठाला यश आलेले नाही. ठराविक व साचेबध्द औषधांच्या मात्राच विद्यापीठ व कृषि विभागाकडून सांगण्यात येतात. परंतु आंब्यासाठी हेच औषध वापरा असे स्पष्ट सांगितले जात नाही. त्यामुळे अनेक औषधे वापरुन बागायतदाराला तोट्यात जावे लागत आहे. त्यात आंबा झाडाचेही नुकसान होत आहे. यासाठी विद्यापीठाने संशोधन करण्यासाठी रत्नागिरीतच प्रयोगशाळा उभारावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. परंतु त्यावर अद्याप तोडगा निघालेला नसल्याचे ज्ञानेश पोतकर यांनी सांगितले.

कर्नाटक आंब्याचे आक्रमण मोडून काढण्यासाठी प्रशासनाने व कृषि विभागाने प्रयत्न करायला हवेत. हापूस ऐवजी कर्नाटक आंबा म्हणून विक्री करण्यास आमची हरकत नाही, परंतु हापूस म्हणून तो विकला जाऊ नये, अशी भूमिका शेतकर्‍यांनी व्यक्त केली. आंबा बागायतदारांचे प्रश्न सुटावेत यासाठी वारंवार निवेदने देऊनही मार्ग निघत नसल्याने हिवाळी अधिवेशनापूर्वी उपोषणाला बसण्याचा इशारा यावेळी आंबा बागातदारांनी दिला. कोकणातील आंबा बागायतदारांसाठी योग्य निर्णय व्हावा, नाहीतर यावेळी आक्रमकपणे आंबा बागायतदार रस्त्यावर उतरतील असाही इशारा देण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news