रत्नागिरी : हापूसचे यावर्षी 50 टक्केच उत्पादन!

रत्नागिरी : हापूसचे यावर्षी 50 टक्केच उत्पादन!

देवगड; पुढारी वृत्तसेवा : हवामानात वारंवार होणार्‍या बदलाचा फटका यावर्षीही हापूस आंबा पिकाला बसला आहे. यावर्षी हापूस मोहर व फळावर मोठ्या प्रमाणात थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे हापूस उत्पादनातही मोठी घट झाली आहे. अवकाळी पाऊस, वाढता उष्मा, ढगाळ वातावरण, अपुरी थंडी याचा गंभीर परिणाम हापूस आंबा उत्पादनावर होतो. विविध प्रकारच्या कीड व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हापूस कलम, मोहर व फळावर होतो. यावर्षी जेमतेम 50 टक्केच आंब्याचे उत्पादन असेल, अशी शक्यता बागायतदारांनी वर्तविली आहे.

दुसरीकडे झाडावरील फळे वाचविण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी बागायतदारांना करावी लागत आहे. मात्र, त्या तुलनेत आंबा उत्पादन व दरही मिळत नसल्याने बागायतदार अर्थिक चिंतेत सापडला आहे. सिंंधुदुर्ग जिल्ह्याचे अर्थकारण प्रामुख्याने आंबा, काजू व मच्छीमारी व्यवसायावर अवलंबून आहे. या तिन्ही व्यवसायांना हवामानात वारंवार होणार्‍या बदलाचा मोठा फटका बसत आहे. तापमानात वाढ झाल्यास फळ डागळण्याबरोबरच फळ गळण्याचे प्रमाणही वाढते. यावर्षी प्रतिकूल हवामानामुळे हापूस कलमांवर मोठ्या प्रमाणात थ्रीप्स रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. याला प्रतिबंध करण्यासाठी महागड्या कीटकनाशकांची फवारणी वारंवार करावी लागत आहे.

एकीकडे हापूस उत्पादन कमी असूनही त्या तुलनेत मार्केटमध्ये हापूस आंब्याला अपेक्षित दर मिळत नाही. सध्या पाच डझनच्या पेटीला 3500 रुपयांपेक्षाही कमी दर मिळत आहे. हा दर किमान 5 हजार रुपये तरी हवा, तरच हापूस उत्पादन व खर्चाचा ताळमेळ बसेल, असे बागायतदारांचे म्हणणे आहे.

यावर्षी वातावरणातील बदलाचा मोठा परिणाम आंबा पिकावर झाला आहे. ऑक्टोबरपासून कलमांना मोहर येण्यास सुरुवात झाली. आता मार्चमध्येही मोहर येत आहे. यामुळे पाच महिने मोहर येण्याची प्रक्रिया सुरू आहे. थ्रीप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे फळ टिकविण्यासाठी मोठ्या प्रमाणात फवारणी करावी लागत आहे. सध्या गतवर्षीसारखा फळमाशीचा उपद्रव अजून नाही. तरीही मोहरातून आलेले फळ टिकविण्याचे खर्चिक आव्हान बागायतदारांसमोर आहे. थ्रीप्समुळे मोठ्या प्रमाणात खार पडत असून मोहर करपून जात आहे. यासाठी फवारणी, कीटकनाशकांचा खर्च व मजुरी यांनी बागायतदार मेटाकुटीला आला आहे.
जनार्दन तेली, प्रयोगशील बागायतदार-वाघोटन

आंब्यावर डाग पडण्याची भीती

यावर्षी 50 टक्के आंब्याचे उत्पादन आहेे. त्यात मार्चमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला असल्याने बागायतदार चिंतेत आहेत. पाऊस पडल्यास आंब्यावर डाग पडण्याची भीती आहे. हे संकट उद्भवल्यास बागायतदारांना मोठा फटका बसेल. यावर्षी सुरुवातीला मोहर आल्यानंतर 10 टक्केच आंबा तयार झाला. त्यानंतर मोहर आला. मात्र, नोव्हेंबर महिन्यात पालवीतून आलेला मोहर काडीला पक्वता नसल्याने टिकत नाही. यामुळे मे महिन्यात आंबा जास्त होईल अशा आशेवर बागायतदार होता; परंतु आशेवर निराशेचे ढग आहेत. रत्नागिरी, वेंगुर्ला येथेही आंब्याचे उत्पादन कमी आहे. त्यामानाने खर्च जास्त असून उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी स्थिती उद्भवल्यास बागायतदारांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसेल.
– विद्याधर जोशी, आंबा बागायतदार, देवगड

सध्या वाशी मार्केटबरोबरच गुजरात-राजकोट, अहमदाबाद येथे आंबा जात आहे. यामध्ये पायरी व केशरी आंबा आहे. मात्र, अपेक्षित दर मिळत नाही. थ्रीप्स वाढला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फवारण्या सुरू आहेत. बदलत्या वातावरणामुळे आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून या वातावरणाची झळ आंबा पिकाला बसली आहे. मोहर 40 टक्केच आला आहे; मात्र मे महिन्यापर्यंत आंबा किती टिकेल, हे सांगता येत नाही.
– अरविंद वाळके, आंबा बागायतदार

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news