आजपासून ‘रणजी चषक’चा थरार, रहाणे-पुजारा एकमेकांसमोर उभे ठाकणार 

आजपासून ‘रणजी चषक’चा थरार, रहाणे-पुजारा एकमेकांसमोर उभे ठाकणार 
Published on
Updated on

अहमदाबाद ; वृत्तसंस्था : देशातील कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती सुधारल्यानंतर भारतीय क्रिकेटमधील महत्त्वाची असलेल्या रणजी चषक क्रिकेट उद्यापासून (गुरुवार) जैव सुरक्षित वातावरणात (बायो बबल) सुरुवात होईल. स्पर्धेच्या माध्यमातून युवा खेळाडूंसोबत अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा सारख्या अनुभवी खेळाडूंना आपली कसोटी कारकीर्द टिकवण्याची संधी मिळेल.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेमुळे देशातील या महत्त्वाच्या स्पर्धेवर पुन्हा एकदा रद्द होण्याचे सावट निर्माण झाले होते; पण प्रादुर्भाव कमी झाल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याच्या आयोजनाचा निर्णय घेतला. स्पर्धेत 38 संघ सहभाग नोंदवणार असून जैव सुरक्षित वातावरणात स्पर्धा आयोजनाचे आव्हान असणार आहे.

प्रत्येक संघ खेळणार तीन लीग सामने 

हे सर्वात कमी काळाचे प्रथम श्रेणी सत्र असेल ज्यामध्ये प्रत्येक संघाला केवळ तीन लीग सामने खेळण्यास मिळतील. त्यामुळे सामन्यासाठी मिळणारी रक्कम देखील कमी होणार आहे तसेच चुका सुधारण्यासाठी वेळही कमी असेल. एलिट गटात एकूण आठ गट बनविण्यात आले आहेत. ज्यामध्ये प्रत्येक गटात चार संघ असतील. तर, प्लेट गटात सहा संघ असतील. एकमात्र उप-उपांत्यपूर्व सामना सोडल्यास बाद फेरीचे सामने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) नंतर 30 मे पासून सुरू होतील.

नवोदित करणार प्रथम श्रेणीत पदार्पण

प्रियांक पांचाल, अभिमन्यू ईश्वरन आणि हनुमा विहारी सारख्या खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असतील. यासोबतच यश धूल आणि राज अंगद बावा या 19 वर्षांखालील संघातील खेळाडूंना देखील प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळेल. पहिला डाव पूर्ण न झाल्यास दोन्ही संघांना एक-एक गुण दिले जातील.

अजिंक्य रहाणे-पुजारा एकमेकांसमोर उभे ठाकणार 

सर्वांच्या नजरा गतविजेत्या सौराष्ट्र व 41 वेळा जेतेपद मिळवणार्‍या मुंबई संघादरम्यान होणार्‍या सामन्यावर असणार आहे. या लढतीत रहाणे व पुजारा एकमेकांसमोर असतील. या दोन्ही खेळाडूंचा प्रयत्न मोठी खेळी करण्याचा असणार आहे. हे दोन्ही अनुभवी खेळाडू सध्या नेटस्मध्ये कसून सरावर करत आहेत. रहाणे आणि पुजारा यांना चांगली खेळी करावी लागेल.

कारण, श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी लवकरच संघ निवडला जाणार आहे. रणजी स्पर्धेचे आयोजन देशातील नऊ ठिकाणी होणार आहे. सामने राजकोट, कटक, अहमदाबाद, चेन्नई, तिरुवनंतपूरम, दिल्ली, हरियाणा, गुवाहाटी आणि कोलकाता मध्ये होतील. जेथे नऊ बायो बबल तयार करण्यात आले आहेत. खेळाडूंना पाच दिवस क्वारंटाईन राहावे लागले आणि त्यामुळे गुरुवारपासून सुरू होणार्‍या पहिल्या फेरीतील सामन्यासाठी त्यांना दोन दिवस सराव मिळाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news