रंगोत्सव 2024 : शहरातील पेशवेकालीन रहाडी रंगाची उधळण करण्यासाठी होताय सज्ज, तुम्हीही येताय ना!

नाशिक: रंगपंचमीनिमित्त आठ फूट खोल असलेल्या रहाडींभोवती सुरक्षेसाठी बॅरीकेडस् लावण्यात आले आहे. (छाया: हेमंत घोरपडे)
नाशिक: रंगपंचमीनिमित्त आठ फूट खोल असलेल्या रहाडींभोवती सुरक्षेसाठी बॅरीकेडस् लावण्यात आले आहे. (छाया: हेमंत घोरपडे)

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
होलिकाेत्सवानंतर नाशिककरांना आता रंगपंचमीचे वेध लागले आहेत. येत्या शनिवारी (दि.३०) रंगपंचमी साजरी होणार असून, त्यासाठी रंगप्रेमी सज्ज झाले आहेत. नाशिकच्या रंगोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या रहाडी उघडण्यात आल्या आहेत. या रहाडींच्या डागडुजी व रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, रंगपंचमीसाठी निरनिराळे नैसर्गिक रंग तसेच बच्चे कंपनीच्या पिचकाऱ्यांनी बाजारपेठ सजली आहे.

नाशिक आणि रंगपंचमी हे वर्षानुवर्षापासूनचे अतूट समीकरण बनले आहे. शहरातील पेशवेकालीन रहाडी आजही या पारंपरिक उत्सवाची आठवण करून देत आहेत. अवघ्या पाच दिवसांवर हा उत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे जुने नाशिक व पंचवटी परिसरातील पारंपरिक रहाडी उघडण्यात आल्या आहेत. रंगपंचमीला त्या जनतेसाठी खुल्या केल्या जातील. तत्पूर्वी या रहाडींची डागडुजी केली जात असून, रंगरंगोटीवर भर दिला जात आहे. रहाडीत जाऊन एकदा तरी धप्पा मारल्या शिवाय नाशिककरांची रंगपंचमी पूर्ण होत नाही. त्यामुळे यंदाही रहाडीत धप्पा मारण्यासाठी नागरिकांनी तयारी केली असून, त्यांची आतूरता शिगेला पोहोचली आहे.

रंगपंचमीसाठी विविध नैसर्गिक रंग विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत. दहा रुपये तोळ्यापासून ते १५० ते २०० रुपयांपर्यंत साधारणत: रंगाचे दर आहेत. याशिवाय बच्चे कंपनीकरिता बाजारात विविध आकारातील व वेगवेगळ्या रंगाच्या पिचकाऱ्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये विविध राजकीय पक्षांचे व नेत्यांचे छायाचित्र असलेल्या पिचकाऱ्यांसह बंदूक, कार्टून्स, डंपर, टँक यांचा समावेश आहे. साधारणत: ४० रुपयांपासून ते ८०० रुपयांपर्यंत या पिचकाऱ्यांचे दर आहेत.

संस्कृती, परंपरा जपून
पेशवेकालीन रहाडींची संस्कृती व परंपरा आजही नाशिककरांनी जपली आहे. दरवर्षी रंगपंचमीच्या साधारणत: आठ दिवसांपूर्वी रहाडी उघडल्या जातात. त्यांची स्वच्छता व छोटी-मोठी कामे केल्यानंतर रंगपंचमीच्या आदल्यादिवशी या रहाडींमध्ये पाणी भरून ठेवले जाते. तर रंगपंचमीला नैसर्गिक रंग तयार करून ताे रहाडीत मिसळला जाताे. त्यानंतर रहाडीच्या मानकरी असलेल्या घराण्यांकडून जलदेवतेचे पूजन करून ती सर्वसामान्यांसाठी खुली करून दिली जाते.

रहाडीतील रंगाला महत्त्व
जुने नाशिक व पंचवटीत पेशवेकालीन रहाडींची परंपरा आजही जपली जात आहे. साधारणत: २५ बाय २५ फुटांचे तसेच आठ फूट खाेल असलेल्या या दगडी हाैदांना विशेष महत्त्व आहे. रंगपंचमीला रहाडीच्या रंगात धप्पा मारल्याने पुढील वर्षभर कोणताही आजार होत नाही, अशी नाशिककरांची धारणा आहे. त्यामुळे दरवर्षी रहाडींवर येणाऱ्या रंगप्रेमींच्या संख्येत वाढच होत आहे.

यंदा विशेष लक्ष
रहाड परंपरेच्या नावलौकिकात दरवर्षी भर पडते आहे. त्यातूनच गेल्या वर्षी तिवंधा येथील रहाडीत मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिसांना गर्दी पांगविण्यासाठी साैम्य लाठीचार्जदेखील करावा लागला. हा अनुभव लक्षात घेत पोलिसांनी रहाडीसाठी यंदा विशेष अशी तयारी केली आहे. प्रत्येक गोष्टीवर पोलिसांची बारकाईने नजर असणार आहे.

नाशिक: शहरातील पेशवेकाळात बांधलेल्या रहाडी अर्थात भूमिगत दगडी हौद आहेत. या रहाडींवरून सतत वाहतूक, रहदारी सुरू असते. मात्र, रंगोत्सवाच्या निमित्ताने बंद असलेल्या रहाडी खुल्या करुन स्वच्छ करताना नागरिक. (छाया : हेमंत घाेरपडे)
नाशिक: शहरातील पेशवेकाळात बांधलेल्या रहाडी अर्थात भूमिगत दगडी हौद आहेत. या रहाडींवरून सतत वाहतूक, रहदारी सुरू असते. मात्र, रंगोत्सवाच्या निमित्ताने बंद असलेल्या रहाडी खुल्या करुन स्वच्छ करताना नागरिक. (छाया : हेमंत घाेरपडे)

या आहेत रहाडी
-तिवंधा चौक, जुने नाशिक
– शनि चौक, पंचवटी
– दिल्ली दरवाजा, गाडगे महाराज पूल, गोदाघाट
– जुनी तांबट लेन, जुने नाशिक
– मधली होळी, जुने नाशिक

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news