रणधुमाळी 2024 | ‘राजाभाऊ वाजे आगे बढो…’ च्या घोषणा तर दुसरीकडे करंजकरांची नाराजी!

नाशिक : महाविकास आघाडीतर्फे नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या ठाकरे गटाने सिन्नरचे माजी राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर केल्याने शालिमार शिवसेना कार्यालयासमोर जल्लोष करताना कार्यकर्ते (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक : महाविकास आघाडीतर्फे नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या ठाकरे गटाने सिन्नरचे माजी राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर केल्याने शालिमार शिवसेना कार्यालयासमोर जल्लोष करताना कार्यकर्ते (छाया : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाविकास आघाडीतर्फे नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी अधिकृतरीत्या जाहीर केल्यानंतर शालिमार येथील शिवसेना भवनासमोर वाजे समर्थकांनी बुधवारी(दि.२७) जोरदार शक्तिप्रदर्शन केले. रॅलीद्वारे आगमन झालेल्या वाजे यांचे फटाक्यांची आतषबाजी आणि ढोलताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर आयोजित मेळाव्यात 'पक्षश्रेष्ठींचा आदेश पाळणे शिवसैनिकांचा धर्म' असल्याचे सांगत जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी वाजे यांना लोकसभा निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन केले.

'राजाभाऊ वाजे आगे बढो…', 'कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला' अशा घोषणांनी यावेळी शिवसेना भवन दुमदूमून गेले होते. विजय करंजकर यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत होते. परंतू निवडणूक जिंकण्याचे गणित लक्षात घेता पक्षप्रमुखांनी उमेदवारीसाठी राजाभाऊ वाजे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. आपण आदेश पाळणारे शिवसैनिक आहोत. करंजकरांशी मतभेद नाहीत. ते आपलेच आहेत. परंतू पक्षनेतृत्वाने दिलेल्या आदेशांचे पालन करणे सर्व शिवसैनिकांचे कर्तव्य आहे, असे जिल्हाप्रमुख बडगुजर यांनी नमूद करत वाजे यांच्यासारख्या निस्पृह, मितभाषी, निष्ठावान, व्यक्तिमत्वाला मिळालेली उमेदवारी नाशिक मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या विजयाचा गुलाल उधळण करणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. शिवसेनेला नेस्तनाबूत करू पाहणाऱ्या भाजपला आणि त्यांच्यासोबत गेलेल्या गद्दारांना गाडण्याची हीच संधी असल्याचे सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनी सांगितले. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना उमेदवारीसाठी झगडावे लागत असल्याचे सांगत त्यांनी आत्मपरिक्षण करावे, असा सल्लाही गायकवाड यांनी हेमंत गोडसे यांना दिला. वाजे यांची उमेदवारी निश्चिती विजयी मेळाव्याची सुरूवात असल्याचा दावा वसंत गिते यांनी केला. जातीपातीच्या राजकारणाला भुलू नका. पक्ष फोडले, खासदार, आमदारच नव्हे तर घरही फोडणाऱ्या आणि समाजासमाजात भांडणं लावणाऱ्या भाजपला गाडण्याची हीच वेळ असल्याचे वसंत गिते यांनी सांगितले. मुशीर सय्यद, डी. जी. सूर्यवंशी यांचेही यावेळी भाषण झाले. माजी महापौर विनायक पांडे, सचिन मराठे, यतीन वाघ, दीपक दातीर आदी यावेळी उपस्थित होते.

'शब्द' पाळल्याचे फळ: वाजे
मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शिवसेनेतच राहिल, असा शब्द मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिला होता. त्यामुळेच त्यांनी मला सिन्नर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी दिली होती. पु्न्हा उमेदवारी दिली. पण मी गत निवडणुकीत कमी पडलो. पण पक्षाची साथ सोडली नाही. मधल्या आव्हानाच्या काळातही अनेकांनी आमिषं दाखविली. राजकारणात शब्द पाळायचा नसतो, असे सांगत खिल्ली उडवली. परंतू 'शब्द' पाळल्यामुळेच आज मला उमेदवारी मिळाली, असे सांगत राजाभाऊ वाजे यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आभार मानले.

थेट उद्धव ठाकरेंचा फोन!
राजाभाऊ वाजे यांच्या उमेदवारीच्या समर्थनार्थ शिवसेना भवनात मेळावा सुरू असतानाच जिल्हाप्रमुख बडगुजर यांचा फोन खणखणला. फोनवर थेट पक्षप्रमुख उध्दव ठाकरे बोलत होते. स्थानिक परिस्थितीविषयी ठाकरे यांनी विचारणा केल्यानंतर सर्व काही ठिक असल्याचे तसेच वाजे यांच्या समर्थनार्थ मेळावा सुरू असल्याचे बडगुजर यांनी सांगितले. करंजकर यांची समजूत घातली जाईल, असेही बडगुजर म्हणाले. यानंतर वाजे यांनी देखील पक्षप्रमुखांशी चर्चा केली. पहिल्याच मेळाव्यात पक्षप्रमुखांकडून होणारी विचारपूस हा शुभशकूनच असल्याचे वाजे म्हणाले.

करंजकर, घोलप अनुपस्थित
ठाकरे गटातर्फे राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी निश्चित झाल्यामुळे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर नाराज झाले आहेत. त्यांनी वाजे यांच्या समर्थनार्थ शिवसेना भवनात आयोजित मेळाव्यात उपस्थित राहणे टाळले. देवळाली मतदारसंघातील माजी आमदार योगेश घोलप हेही या मेळाव्यास उपस्थित नव्हते. त्यामुळे चर्चेला उधाण आले होते. करंजकर यांची नाराजी दूर केली जाईल, असे सुधारक बडगुजर, दत्ता गायकवाड यांनी सांगितले. तर, करंजकर यांची भेट घेणार असल्याचे वाजे यांनी स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news