नवी दिल्ली : हल्ली 'एआय' म्हणजेच 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'च्या सहाय्याने अनेक थक्क करणार्या गोष्टी घडवल्या जात आहेत. त्याची दोन ताजी उदाहरणे आता समोर आली आहेत. एका व्हिडीओमध्ये अयोध्येच्या राममंदिरातील अत्यंत सुंदर अशी रामलल्लाची मूर्ती चक्क इकडे तिकडे पाहत गोड हसत असताना दिसते. तर दुसर्या एका उदाहरणात आता 'स्वरकोकिळा' लता मंगेशकर हयात असत्या तर त्यांनी 'राम आऐंगे' हे सध्या गाजत असलेले भजन कसे गायिले असते हे ऐकवले आहे. त्यामधील आवाज हुबेहूब लतादीदींसारखाच असून त्यांनीच हे भजन गायिले असावे, असा ऐकणार्याला भास होतो!
अयोध्येतील श्रीरामलल्लाची पाच वर्षांच्या दिव्य आणि गोंडस बालकाच्या रूपातील मूर्ती पाहून अवघ्या जगाच्या डोळ्यांचे पारणे फिटले! ही दिव्य छबी पाहून अनेकांची स्थिती 'अश्रुनीर वाहे डोळा' अशी झाली! आता हेच गोड रूप आपले कमळाच्या पाकळीसारखे टपोरे डोळे इकडे तिकडे हलवून पाहत असताना, गोड हसत असताना दिसले तर? अशीच कल्पना करून रामलल्लाचा हा 'एआय'च्या सहाय्याने व्हिडीओ बनवण्यात आला आहे.
या व्हिडीओत रामलल्लाचे पापण्यांची उघडझाप करीत इकडे तिकडे सुहास्य वदनाने पाहत असताना दर्शन होते. तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर शेअर करण्यात आला. हा व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले! साक्षात रामलल्लाच भक्तांकडे प्रेमळ नजरेने, स्मितहास्य करीत पाहत असल्यासारखे अनेकांना वाटले. रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावेळी अनेकांना लतादीदींचीही उणीव भासत होती. आज त्या असत्या तर सध्या गाजत असलेले 'राम आयेंंगे' भजन त्यांनी कसे गायिले असते याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. हा व्हिडीओही 'एक्स' वर शेअर करण्यात आला. त्यामधील आवाज ऐकून अनेक लोक थक्कच झाले. हे भजन खरोखरच लता मंगेशकर यांनीच गायिले असल्याचा भास यामधून निर्माण झाला! या दोन्ही उदाहरणांमधून आता भविष्यात 'एआय' ची करामत पाहून तो माणसाला कसा थक्क करू शकतो याची कल्पनाही लोकांना आली.