पुढारी ऑनलाईन डेस्क : Ram Mandir Consecration : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री रामजन्मभूमीवर उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरातील रामललाच्या अभिषेकाची वेळ हळूहळू जवळ येत आहे. 22 जानेवारी 2024 रोजी हा सोहळा होणार आहे. दरम्यान, या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी देश-विदेशातील लाखो लोक अयोध्येत पोहोचण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आखलेल्या योजनेनुसार श्री राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आणि अयोध्या विकास प्राधिकरणातर्फे ठिकठिकाणी तंबू शहरे बांधली जात आहेत. यामध्ये राहण्याची व भोजनाची उत्तम व्यवस्था केली जाणार आहे.
विकास प्राधिकरणाचे सचिव सत्येंद्र सिंह यांनी सांगितले की, माढा गुप्तार घाट, बाग बिजेसी आणि ब्रह्मकुंड, या ठिकाणी टेंट सिटी उभारण्यात येणार आहे. यात सुमारे हजारो भाविकांची राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. माढा गुप्तार घाट येथे 20 एकर जागेवर टेंट सिटी उभारण्यात येत आहे. यात सुमारे 20,000 ते 25,000 भाविक राहू शकतात, असे अयोध्या विकास प्राधिकरणाचे सचिव सत्येंद्र सिंह यांनी राज्य सरकारच्या निवेदनात म्हटले आहे. तर, अयोध्या धाममधील ब्रह्मकुंडजवळील टेंट सिटीमध्ये 35 मोठे तंबू असण्याची अपेक्षा आहे. ज्यात 30,000 भाविकांच्या राहण्याची सोय करण्यात येत आहे. बाग बिजेसीमध्ये 25 एकर तंबू उभारले जात आहेत जिथे सुमारे 25,000 भाविक राहू शकतात. (Ram Mandir Consecration)
सत्येंद्र सिंह यांनी पुढे सांगितले की, भाविकांच्या मुक्कामासाठी कार सेवकपुरम आणि मणिराम दास कॅन्टोन्मेंटमध्ये टेंट सिटीही उभारण्यात येणार आहे. 22 जानेवारीला अभिषेक सोहळ्याच्या वेळी कडाक्याची थंडी असेल. अशा स्थितीत येथे येणाऱ्या भाविकांना राहण्यासाठी टेंट सिटी उभारण्यात येत आहे. हिवाळ्यात होणारा प्राणप्रतिष्ठा महोत्सव पाहता भाविकांचे थंडीपासून संरक्षण व्हावे, अशा पद्धतीने टेंट सिटी उभारण्यात येणार आहे. यासाठी गाद्या आणि ब्लँकेटचीही व्यवस्था करण्यात येत आहे. येथे राहणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छतागृहे आणि स्नानगृहांसोबतच अन्नसाठा आणि वैद्यकीय शिबिराचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. एडीएकडून उभारण्यात येत असलेली टेंट सिटी कंत्राटदारांकडून बांधली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (Ram Mandir Consecration)