पुढारी ऑनलाईन डेस्क – चित्रपट 'स्लमडॉग मिलियनेयर' (२००८) आणि त्यातील लोकप्रिय गाणे 'जय हो' सर्वश्रृत आहे. या गाण्याने ऑस्कर शिवाय गोल्डन ग्लोब, ग्रॅमी आणि बाफ्टासह अनेक पुरस्कार आपल्या नावे केले होते. 'जय हो'ला संगीत ए आर रहमान यांनी दिले होते. या गाण्यानंतर ए आर रहमान यांचे जगभरातून कौतुक झाले. ए आर रहमान यांनी ऑस्कर जिंकला. पण आता दिग्दर्शक रामगोपाल वर्माने मोठा दावा केला आहे की, गायक सुखविंदर सिंह यांनी ते बनवले होते. या गाण्याशी संबंधित अनेक किस्से त्यांनी शेअर केले. रामगोपाल वर्मा यांनी सांगितलं की, एआर रहमान आणि सुभाष घई यांच्यातील वादाचे कारण काय आहे.
'युवराज' चित्रपटाच्या शूटिंग वेळी सुभाष घई (Subhash Ghai) आणि ए आर रहमान (A R Rahman) यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर रहमान यांनी त्या चित्रपटासाठी कम्पोज केलेले गाणे दुसऱ्या चित्रपट निर्मात्याला दिलं. त्यानंतर या गाण्यासाठी ए आर रहमान यांना ऑस्कर मिळाला. राम गोपाल वर्माने (Ram Gopal Varma) एका मुलाखतीत सांगितलं की, ए आर रहमान चित्रपट 'युवराज'मध्ये संगीत दिग्दर्शक म्हणून काम करत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष घई होते.
रामगोपाल वर्माच्या माहितीनुसार, सुभाष घई यांनी एआर रहमान यांना एका गाण्याचे संगीत तयार करायला सांगितले. पण, रहमान आपल्या बिझी शेड्यूलमुळे करू शकत नव्हते. गाणं कंपोज करण्यासाठी उशीर झाल्यामुळे सुभाष घई भडकले. तेव्हा त्यांनी रागाच्या भरात ए आर रहमान यांना खूप ऐकवले. ए आर रहमान यांनी सांगितले की, ते लंडनमधून वापस येऊन त्यांना सुखविंदर सिंह यांच्या स्टुडिओमध्ये भेटतील. ए आर रहमान जेव्हा लंडनमध्ये होते, तेव्हा त्यांनी गायक सुखविंदर सिंह यांना ट्यून बनवण्यासाठी सांगितले. ते सुखिवंदर सिंह यांनी बनवले.
जेव्हा सुभाष घई दिलेल्या वेळेनुसार सुखविंदर सिंहच्या स्टुडिओमध्ये पोहोचेले, तेव्हा त्यांनी पाहिले की, ए आर रहमान यांच्या जागी सुखविंदर ट्यून तयार करत आहे. सुभाष घई यांनी विचारलं तर सुखविंदरने सांगितलं की, ए आर रहमान यांनी त्याला एका गाण्याचे संगीत तयार करायला सांगितले आहे. त्यावेळी तिथे ए आर रहमान देखील पोहोचले आणि सुखविंदर ला विचारलं की, संगीत तयार झालं का? मग त्याने घईना ट्य़ून ऐकवली. सुभाष घई भडकले- तुम्ही कोण, माझ्याकडून पैसे घेऊन सुखविंदरला ट्यून बनवायला सांगणारे? मी कोटी रुपयांची फी देत आहे, तुम्हाला म्युझिक डायरेक्टर बनवलं आणि तुम्ही सुखविंदरकडून ट्यून बनवून घेत आहात? माझ्यासमोर हे करण्याची तुमची हिंमत कशी झाली? जर मला सुखविंदरला घ्यायचे असेल, तर त्याला मी साईन करेन.
रामगोपाल वर्माच्या माहितीनुसार, ए आर रहमान यांनी सुभाष घईला उत्तर दिलं होतं की, तुम्ही माझ्या नावाचे पैसे देत आहात, माझ्या संगीताचे नाही. जर मी या गाण्याला एंडोर्स करत आहे तर, हे माझे गाणे आहे, म्हणजेच ए आर रहमान म्युजिक आहे. तुम्हाला काय माहिती आहे की, 'ताल'चे संगीत कसे बनवले? काय माहित ते माझ्या ड्रायव्हर वा दुसरे कोणीतीरी बनवले असेल.'