कोल्हापूर : पंत अमात्य बावडेकर घराण्याची रामभक्ती

कोल्हापूर : पंत अमात्य बावडेकर घराण्याची रामभक्ती
Published on
Updated on

कोल्हापूर : शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्याचे हुकुमतपनाह तथा रामचंद्रपंत अमात्य यांच्या घराण्याने प्रभू श्रीराम यांच्या भक्तीचा वारसा जपला आहे. त्यांच्या गगनबावडा जहागिरीत रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता. त्यांच्या वंशजांनी आजही रामपंचायतन आणि रघुवीर यंत्राचे जतन-संवर्धन केले आहे.

शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज पहिले करवीरकर आणि करवीर संस्थानचे छत्रपती संभाजी महाराज या पाच छत्रपतींच्या काळात अमात्यपदी हुकुमतपनाह रामचंद्रपंत अमात्य यांनी कार्यभार सांभाळला. रामदास स्वामी यांच्या भेटीवेळी त्यांनी रामचंद्रपंत अमात्य यांना सोन्याचे रघुवीर यंत्र दिले होते. त्यातून प्रेरणा घेऊन अमात्यांनी आपल्या गगनबावडा जहागिरीमध्ये रामनवमी सोहळा सुरू केल्याचा इतिहास आहे. रामचंद्रपंतांच्या दैनंदिन पूजेत सुवर्ण रघुवीर यंत्रासह सुवर्ण रामपंचायतनही होते. या पंचायतनमध्ये प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण, भरत आणि हनुमान यांच्या सोने-चांदीचे कोरीव काम असणार्‍या 9 मूर्तींचा समावेश आहे.

अमात्यांनी रामनवमीचा हा उत्सव केवळ आपल्या वाड्यापुरता न ठेवता जहागिरीतील सर्वांनाच त्यामध्ये सामील करून घेतले. उत्सवासाठी वैयक्तिक निमंत्रणेही पाठवली जात. तळकोकणातील नागरिकांबरोबरच करवीर संस्थानातील सरदार, मानकरी यांच्यासोबत छत्रपती देखील या उत्सवाला उपस्थित असायचे. याबाबतची मोडी लिपीतील कागदपत्रे उपलब्ध आहेत.

उत्सवाच्या निमित्ताने आयोजित केली जाणारी संगीत मैफल सजवण्यासाठी देशभरातील अनेक गायक गगनबावड्याला येत. अमात्यांच्या गगनबावडा येथील ऐतिहासिक वाड्यातील देवघरासमोर ही मैफल भरायची. रहिमतखान, करवीर संस्थानचे दरबारातील गायक गायनमहर्षी अल्लादियाखान, लक्ष्मीबाई, बशीरखान, भास्करबुवा, गोविंदराव टेंबे, इस्माईल सतारिया अशा अनेक दिग्गजांनी रामनवमीची मैफल सजवल्याच्या नोंदी मिळतात. रामनवमीच्या पालखी सोहळ्यात भालदार, चोपदार, रोषणनाईक, घोडे, वाजंत्री, भजनी मंडळ यांचा लवाजमा असायचा. सोहळ्यानंतर भोजन प्रसादाचा आस्वाद उपस्थित घेत होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news