नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
राजस्थानमधील व्यवसायाने टेलर असलेल्या कन्हैयालाल यांची दोन नराधमांनी निर्घृण हत्या केल्याचा मुद्द्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून या हत्येसाठी पक्षाने राज्यातील काँग्रेस सरकारला जबाबदार धरले आहे. ही हत्या नाही तर दहशतवादी घटना असल्याची प्रतिक्रियादेखील भाजपचे नेते राजवर्धन राठोड यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
भाजपमधून निलंबित करण्यात आलेल्या नेत्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत केलेल्या विधानाचे कन्हैयालालच्या मुलाने समर्थन केले होते. त्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी दोन नराधमांनी गळा चिरून तालिबानी पध्दतीने कन्हैयालालची क्रूर हत्या केली होती. उदयपूरमध्ये झालेल्या या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत.
कन्हैयालालच्या हत्येनंतर देशभरात मोठा आक्रोश निर्माण झाला असून राजस्थानमधील लोकांत असुरक्षिततेची भावना तयार झाली आहे, असे राठोड यांनी सांगितले. गेल्या सहा महिन्यांत एकही दिवस असा गेला नाही की ज्यादिवशी राजस्थानमध्ये दहशतवादी घटना झाली नाही. या सगळ्यासाठी राज्यातले काँग्रेस सरकार जबाबदार आहे. जेव्हा सण येतात, तेव्हा वेगवेगळ्या धर्माच्या लोकांसाठी वेगवेगळे कायदे बनविले जातात. एका धर्माच्या सणांवर बंधने घातली जातात तर दुसऱ्या धर्माच्या लोकांना खुलेआम सूट दिली जाते, असा घणाघात राठोड यांनी केला.