पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळीने झोडपले आहे. दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्या राजारामबापू कारखान्यासमोर ऊस दरवाढीसाठी तळ ठोकला आहे. यावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपलं ठेवायचं झाकून, अन् दुसऱ्याचं बघायचं वाकून, असे म्हणत जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. (Raju Shetti on NCP)
राजू शेट्टी यांनी त्यांच्या X सोशल मीडिया अकाऊंटवरून केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, विरोधी पक्ष म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा पक्ष झाला आहे. आपलं ठेवायचे झाकून आणि दुस-याचं बघायचं वाकून ही भूमिका जयंत पाटील यांनी घेतली आहे. त्यांच्याच कारखान्यावर शेतकरी घामाच्या दामासाठी चिखलात बसला आहे. ज्यांनी एफआरपीचे दोन तुकडे करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालविण्याचे पाप केले आहे. त्यावेळेस तुम्ही त्यांना पाठिंबा देत तोंड बंद करून बसलात, अशी टीका देखील शेट्टी यांनी केली. (Raju Shetti on NCP)
आज कारखाना सुरू होवून जवळपास १ महिना झाला तरीही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नाहीत. सत्ताधारी व विरोधक कारखानदारांना एकत्रित करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नागव करत आहेत. ज्यांना स्वत:च्या मतदारसंघातील शेतक-यांचा आक्रोश ऐकू येत नसेल त्यांनी राज्यातील शेतक-यांना न्याय हक्काची लढाई शिकवू नये, अशी टीका देखील माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यावर केली.
गली जिल्ह्यातील ऊस दरावर तोडगा निघत नसल्याने ऊस दर आंदोलन चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना व राजारामबापू साखर कारखाना प्रशासनामध्ये झालेल्या बैठकीत दरावर कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे संघटनेने आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे. खा. राजू शेट्टी यांच्यासह संघटनेचे शेकडो कार्यकर्ते कारखान्याच्या गेटवर ठिय्या मांडून बसले आहेत.
दुष्काळ, गारपिटीमुळं राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत नाही, पिकाला हमीभाव नाही, फसवा पिक विमा, सरकारच्या फसव्या घोषणा त्यामुळे शेतकरी पिचला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खा. शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यव्यापी 'शेतकरी आक्रोश मोर्चाचं' आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी X अकाऊंटवरून दिली होती.