वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांच्या 426 व्या ऐतिहासिक जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शुक्रवारी (दि. 12) राजगडाच्या मावळातीर्थावर मानवंदना देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी देशभरातील कर्तृत्ववान महिलांसह विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा, कष्टकर्यांचा गौरव करण्यात येणार आहे. राजगडाच्या पायथ्याशी पाल येथील मावळातीर्थावर मावळा जवान संघटनेच्या वतीने जिजाऊ, शिवराय व वीर मावळ्यांचा वारसा जागविण्यासाठी गेल्या 40 वर्षांपासून जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जात आहे. या जन्मोत्सवात गडपूजन, किल्ले चढणे स्पर्धा, व्याख्यान, शाहिरी पोवाडे, शिवकालीन शस्त्रास्त्र खेळ, पालखी मिरवणूक आदी कार्यक्रम होणार आहेत.
जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी पकंज शेळके, सहायक पोलिस निरीक्षक रणजित पठारे, शिवव्याख्याते गणेश फरताळे आदींसह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील मावळ्यांचे वारसदार सहभागी होणार आहेत.
जिजाऊ गौरव पुरस्कारांचे मानकरी
राष्ट्रीय खेळाडू सानिया कंधारे यांच्यासह सांगली येथील रंगराव शिंदे, किरकटवाडी येथील व्यसनमुक्ती चळवळीचे सुभाष नथू हगवणे यांच्यासह देशभरातील विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववानांचा जिजाऊ गौरव पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे यांनी दिली.