India@75 : ‘अहो, माझ्‍या वाटणीचे कपडे राजेसाहेबांनी नव्‍हते का घातले’ : महात्‍मा गांधींनी ब्रिटन दौर्‍यावेळी दिले होते सडेतोड उत्तर

M.K.Gandhi
M.K.Gandhi

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : महात्‍मा गांधी यांनी स्वातंत्र्य लढ्यात अहिंसेला आपले मुख्‍य शस्‍त्र करुन ब्रिटीशांना 'चले जाव' असे सुनावलं. संपूर्ण जगावर राज्‍य करण्‍याचे बिरुद मिरविणार्‍या ब्रिटीशांना आपल्‍या अलौकिक सामर्थ्य आणि अविश्रांतकष्‍टाने त्‍यांनी देशाला पारतंत्रातून मुक्‍त केले. आजही युरोपासह जगभरात भारताची ओळख ' महात्‍मा गांधींचा भारत' अशीच आहे. स्वातंत्र्य लढ्यातील अनेक प्रसंगातून आपल्‍याला महात्‍मा गांधींचा हजरजबाबीपणा दिसून येतो. १९३१ मध्‍ये ब्रिटन दौर्‍यावेळी त्‍यांच्‍या कपड्याबद्‍दल विचारल्‍यानंतर त्‍यांनी ब्रिटीशांना सडेतोड उत्तर दिले होते. महात्‍मा गांधी यांच्‍या या दौर्‍याची आठवण डॉमिनिक लॅपिए आणि लॅरी कॉलिन्‍स यांच्‍या फ्रीडम ॲट मिडनाईट ( अनुवाद माधव मोर्डेकर) या पुस्‍तकात देण्‍यात आली आहे.

अर्धनग्‍न अवस्‍थेबाबत ब्रिटीशांना दिले उत्तर…

५ मार्च १९३१ रोजी गांधी-आयर्विन करार झाला. या करारानंतर महात्‍मा गांधी लंडनला पोहचले. यावेळी त्‍यांनी बकिंगहॅम राजवाड्यात ब्रिटनच्‍या राजाची भेट घेतली. येथे चहापानही झालं. ब्रिटनच्‍या वृत्तपत्रांमध्‍ये त्‍यांचे चहापान घेतानाचे छायाचित्र पाहून सार्‍यांना मौज वाटली. खादीचा पंचा नेसलेले, पायात चपला घातलेले गांधी बघताना गंमत वाटली. यावेळी त्‍यांना त्‍याच्‍या अर्धनग्‍न अवस्‍थेबाबत विचारण्‍यात आले. यावर गांधींनी उत्तर दिले होते की, "अहो, माझ्‍या वाटणीचे कपडे राजेसाहेबांनी नव्‍हते का घातले". महात्‍मा गांधी यांच्‍या भेटीला मोठी प्रसिद्‍धी मिळाली, असेही पुस्‍तकात नमूद करण्‍यात आले आहे.

गांधींच्‍या विनयशीलतेने भारावले ब्रिटनचे नागरिक

यावेळी महात्‍मा गांधी यांनी ब्रिटनच्‍या राज्‍याची घेतलेली भेटीची इंग्‍लंडने दखल घेतली होती. मात्र गोलमेज परिषद
अयशस्‍वी ठरली. तरीही या वेळी गांधींनी आपल्‍या विनयशीलतेने सर्वांची मने जिंकली. "माझे खरे कार्य परिषदेबाहेरच व्‍हायचे आहे. ब्रिटनच्‍या प्रवृत्तीत सौम्‍यपणा निर्माण करण्‍याचे बीज माझ्‍या प्रयत्‍नात आहे". असे गांधी त्‍यावेळी म्‍हणाले होते. त्‍यांच्‍या या उत्तराने ब्रिटीश माध्‍यमांसह नागरिक भारावून गेले. अहिंसंचेच्‍या मार्गाने ब्रिटिश साम्राज्‍य उलथून टाकण्‍याचे स्‍वप्‍न पाहणार्‍या गांधीबद्‍दल ब्रिटीश नागरिकांना अप्रूप वाटत राहिले, असेही या पुस्‍तकात म्‍हटलं आहे.

कोणतेही अवडंबर नाही

आपल्‍या ब्रिटन दौर्‍यात खासगी सचिव, नोकरचाकर यांचे अवडंबर न माजवता काही निवडक अनुयानी व दुधासाठी शेळी जवळ बाळगत गांधींनी दिवस काढले. त्‍यांनी राहण्‍यासाठीही आलिशान हॉटेलऐवजी लंडनच्‍या पूर्वेकडील गरीब वस्‍तीतील एक साधे घरात राहणे पसंत केले.

मशिगनऐवजी शेळी हातात घेवून फिरणारा अवलिया क्रांतिकारक

भारतात परतण्‍यापूर्वी महात्‍मा गांधी ज्‍या देशांमध्‍ये गेले तेथे त्‍यांच्‍या दर्शनासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली. मशिगनऐवजी शेळी हातात घेवून फिरणारा हा अवलिया क्रांतिकारक आहे तरी कसा, हे पाहण्‍यासाठी पाश्‍चिमात्‍य देशातील नागरिक गर्दी करत होते. फ्रान्‍स, स्‍वित्‍झर्लंड, इटली संगळीकडे गांधी दर्शनासाठी त्‍यावेळी गर्दी झाली होती, याचे स्‍मरणही डॉमिनिक लॅपिए आणि लॅरी कॉलिन्‍स यांनी आपल्‍या पुस्‍तकात केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news