पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेश, छत्तीसगड व तेलंगणासह राजस्थान विधानसभा निवडणुकीचा देखील आज (दि. 3 डिसेंबर ) निकाल जाहीर होत आहे. राजस्थानात परंपरा कायम राहणार की, काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार? याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. निवडणुक आयोग निकालाच्या ट्रेंडनुसार, भाजप ८१ जागांवर, तर काँग्रेस ६० जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पिछाडीवर पडताना दिसत आहे. यावरून 'राजस्थानात 'जादुगारा'ची जादू संपली आहे, असा टोला भाजपने काँग्रेसला दिला आहे.
केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत 'एएनआय'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, भाजप या निवडणुकीत मोठ्या बहुमताने जिंकेल. राजस्थानात जादुगाराची जादू संपली असून, ताईत तुटला आहे. राजस्थानच्या जनतेने या निवडणुका काँग्रेसला सत्तेतून पायउतार करण्यासाठी लढल्या होत्या, असेही मंत्री शेखावत यांनी स्पष्ट केले.
राजस्थान विधानसभा निवडणूक मतमोजणी कल येण्यास सुरूवात झाली आहे. निवडणुक आयोगाच्या आकडेवारीनुसार, भाजप ८१ जागांवर, काँग्रेस ६० तर इतर १४ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान भाजपच्या वसुंधरा राजे आघाडीवर असून, काँग्रेसचे सहा मंत्री पिछाडीवर आहे.
राजस्थान विधानसभेच्या २०० जागांपैकी १९९ जागांचा निकाल आज रविवारी (दि. ३) जाहीर होत आहे. एका उमेदवाराच्या मृत्यूमुळे त्या जागेसाची निवडणूक नंतर होणार असल्याचे निवडणूक आयोगाने आधीच जाहीर केले होते. राजस्थानमध्ये विधानसभेच्या १९९ जागांसाठी ७५.४५ टक्के मतदान झाले होते. राजस्थानातील १९९ जागांसाठी १८७५ उमेदवार रिंगणात असून, आज त्यांचे भवितव्य ठरणार आहे. आज निकाल जाहीर होत असताना सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये धाकधूक वाढली आहे.