औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : सांस्कृतिक मंडळावर 1 मे रोजी होणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेला अखेर गुरुवारी (दि. 28) पोलिसांनी परवानगी दिली. सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण होईल, कोणत्याही समुदायाचा अनादर होणार नाही आणि 15 हजारांपेक्षा अधिक नागरिकांना निमंत्रण देऊ नका यासारख्या 16 अटी घालून ही परवानगी दिल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांच्या औरंगाबादेतील सभेमुळे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. परवानगी मिळणार की नाही ? याचीच चर्चा रोज केली जात होती. दरम्यान, दोन दिवसांपासून मनसे नेते बाळा नांदगावकर हे देखील औरंगाबादेत तळ ठोकून बसल्याने सभेबाबत सर्वांनाच उत्सुकता निर्माण झाली होती. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सांस्कृतिक मंडळावर सभेच्या तयारीला जोर आला आहे. त्यातच, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना गुरुवारी पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आणि ग्राऊंडवरील रिपोर्ट तपासून सभेच्या परवानगीबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार, गुरुवारी गुप्ता यांनी तीन पोलिस उपायुक्त, काही सहायक पोलिस आयुक्त यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर मनसेच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. यात त्यांना सभेला परवानगी दिल्याचे सांगून अटी व शर्थींचे पालन करण्याच्या सूचना केल्या.