कोकण, गोव्यात वर्षा पर्यटनाला बहर

कोकण, गोव्यात वर्षा पर्यटनाला बहर
Published on
Updated on

ठाणे/पणजी : पुढारी वृत्तसेवा : ढगांची वर्षासेना बरसू लागल्यानंतर पर्यटकांची पावले वळतात ती साद घालणार्‍या विहंगम पर्यटनस्थळांच्या दिशेने. पावसाचा जोर हळूहळू वाढत चालल्यामुळे निसर्गसौंदर्याने नटलेला गोवा आणि त्याच्या जोडीला कोकणातील पश्चिम घाटामध्ये आंबोली ते माळशेज या सह्याद्री पर्वतरांगेत वर्षा पर्यटन बहरायला सुरुवात झाली आहे. गोव्यात तर भरपावसात मोठ्या संख्येने देशी पर्यटक समुद्रस्नानाबरोबरच वॉटर राफ्टिंगचा आनंद घेताना दिसत आहेत.

ठाण्यातील माळशेज, रायगडमधील माथेरान, अलिबागमधील सिद्धेश्वर, कर्जतमधील बेकरे, आशाने, सोलनपाडा, कोंदिवडे, रत्नागिरीतील मार्लेश्वर, सवतकडा अशी पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजून गेली आहेत. पावसाची रिपरिप सुरू होताच कोकणातील अनेक पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीसह पालघर आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी विकेंड पर्यटनासाठी गर्दी होत आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे जिल्ह्यातील आंबोली, मांगेली, सावडाव या धबधब्यांच्या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक जातात.

पालघर जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाशेजारी असलेल्या आशेरी गडावर मुंबई, ठाणे, गुजरात, पालघर या भागातून हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत.

माथेरानही गजबजले

माथेरान हे डोंगरांनी वेढलेले ठिकाण आहे. मुंबईजवळ कर्जतमध्ये असलेले हे छोटेसे हिल स्टेशन पर्यटकांच्या अतिशय आवडीचे ठिकाण आहे. पावसाची चाहूल लागल्याने तेथेही पर्यटकांची गजबज वाढायला सुरुवात झाली आहे. माथेरानमध्ये पर्यटक प्रबलगढ किल्ला, मंकी पॉईंट, लुईसा पॉईंट, अंबरनाथ मंदिर आणि चार्लोट तलावाला भेट देत थंड आणि शांत निसर्गाचा अनुभव घेताना दिसत आहेत.

गोव्यात राफ्टिंगचा थरार

गोव्यात पावसाळा सुरू होताच उत्तर गोव्यातील कळंगुट, बागा, हरमल, मोरजी आणि दक्षिण गोव्यातील कोलवा, पाळोळे, मोबोर हे मोजके समुद्रकिनारे वगळता अन्य किनार्‍यांवर नीरव शांतता दिसून येते. यंदा गोव्यातील बहुतांश किनारे पर्यटकांनी बहरून गेल्याचे चित्र दिसू लागले आहे. म्हादई नदीवरील वॉटर राफ्टिंगचा थरार भरपावसात पर्यटक लुटत आहेत. शिवाय, समुद्रस्नानाचा आनंदही अनेक पर्यटक घेताना दिसत आहेत. ऑनलाईन बुकिंग करून गोव्यात येणार्‍या पर्यटकांच्या संख्येत चांगली वाढ होऊ लागल्याचे कळंगुट येथील एक टॅक्सीचालक डेस्मंड डिसोझा यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news