पुणे; पुढारी वृत्तसेवा : मान्सूनच्या आगमनामुळे संपूर्ण देशातील कमाल तापमानात घसरणीला सुरुवात झाली असून, आगामी पाच दिवसांत 4 ते 5 अंशांनी तापमान कमी होईल. तसेच देशातील बहुतांंश राज्यांत वळवाचा पाऊस सुरू झाला आहे. विदर्भात 23 ते 26 मे रोजी हलक्या पावसाला सुरुवात होत आहे. मात्र, मध्य महाराष्ट्र, कोकण व मराठवाड्यात 23 रोजी एकच दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यंदाचा उन्हाळा हा देशातील सर्वाधिक उष्णतेचा असून, महाराष्ट्रात सर्वाधिक उष्णतेच्या लाटा येत आहेत.
मात्र, यापासून येत्या काही दिवसांतच सुटका होणार आहे. मान्सूनमुळे देशातील वातावरण बदलून गेले आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने वार्यांची चक्रीय स्थिती झाल्याने जम्मू-काश्मीरसह हिमालयात बर्फवृष्टी सुरू झाली आहे. तसेच उत्तर भारतात बहुतांश ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील कमाल तापमानात येत्या 5 दिवसांत 4 ते 5 अंशांनी घट होणार आहे.
मान्सून अद्याप बंगालच्या उपसागरात वेगाने पुढे जात असून, तो लवकरच तामिळनाडूच्या दिशेने येत आहे. त्यामुळे तामिळनाडू, केरळ, कर्नाटक किनारपट्टीवर पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 28 मेपर्यंत मान्सून कर्नाटकात व 3 ते 4 जूनच्या आसपास केरळात दाखल होण्याची शक्यता आहे.
विदर्भात 23 ते 26
हलका पाऊस
मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात आज पाऊस
– विदर्भ : 23 ते 26 मे
– मध्य महाराष्ट्र : 23 मे
– कोकण : 23 मे
– मराठवाडा : 23 मे