… म्हणून होतात पुणे-मुंबईदरम्यान रेल्वेप्रवाशांचे वाद

… म्हणून होतात पुणे-मुंबईदरम्यान रेल्वेप्रवाशांचे वाद
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवर काढलेले जनरल तिकीटधारक (सेकंड क्लास, जनरल) आणि आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाइन पध्दतीने काढलेल्या तिकीटधारकांमध्ये (सेकंड क्लास, जनरल) जागेवर बसण्यावरून वाद होत असल्याचे मंगळवारी पहाणी दरम्यान समोर आले.

गेल्या काही दिवसांपासून पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वेगाड्यांमध्ये सातत्याने वाद होत असल्याच्या घटना समोर येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर दै. 'पुढारी'कडून पुणे-मुंबईदरम्यान धावणार्‍या सकाळी 6.05 च्या सिंहगड एक्स्प्रेस आणि मुंबईहून पुण्याच्या दिशेने सायंकाळी ४:२५ च्या प्रगती एक्स्प्रेसमध्ये मंगळवारी (दि. 17) प्रवास करून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. त्या वेळी प्रतिनिधीला जनरल डब्यांमध्ये होणार्‍या वादाचे मुख्य कारण पाहायला मिळाले.

आरक्षित जागेवर जनरल तिकीटधारक

पुणे-मुंबई मार्गावर पाहणीदरम्यान कर्जत स्थानकावर सायंकाळी प्रगती एक्स्प्रेस आली. त्या वेळी मुंबईहूनच डी 2 या जनरल डब्यातील एका सीटवर एक महिला आपल्या कुटुंबीयांसह बसली होती. गाडी कर्जतला आल्यानंतर आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशाने महिलेला आपले ऑनलाइन आरक्षित झालेले तिकीट दाखवून आपली जागा देण्याची विनंती केली. मात्र, महिला काही केल्या जागेवरून उठत नव्हती. त्यामुळे काही वेळाने त्या व्यक्तीचे आणि महिलेचे जागेवर बसण्यावरून वाद झाले. तर सकाळी सिंहगड एक्स्प्रेसमध्ये डी 1 डब्यात आरक्षित केलेल्या एका प्रवाशाच्या सीटवर जनरल तिकीटधारक प्रवासी ठाण मांडून बसले होते. तेसुद्धा काही केल्या उठत नव्हते. मात्र, काही वेळाने तिकीट दाखविल्यावर ते उठले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हे वाद थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.

या उपाययोजना होणे आवश्यक…

– गाडीच्या प्रत्येक डब्यामध्ये तिकीट निरीक्षक असावा, तो अनेकदा पाहायला मिळत नाही

– ऑनलाइन तिकिटाप्रमाणेच तिकीट खिडकीवरून काढलेल्या तिकिटावर आसन क्रमांक नमूद करावा

– प्रवाशांच्या वाढत्या गर्दीसाठी पुणे-मुंबई मार्गावर अतिरिक्त रेल्वेगाडी सुरू करावी, खास करून सकाळच्या वेळी

– पुणे-मुंबई मार्गावरील गाड्यांच्या वेळांचे सुसूत्रीकरण करावे; जेणेकरून एकाच वेळी जास्त गर्दी होणार नाही, यासाठी प्रयत्न करावा.

आम्ही आरक्षित केलेल्या तिकिटावर सकाळी एक प्रवासी ठाण मांडून बसला होता. त्याला आम्ही तिकीट दाखवून हटविले. मात्र, अशा प्रकारे आरक्षित जागेवर बसणे चुकीचे आहे. त्या वेळी आम्ही बराच वेळ टीसीला शोधले. मात्र, टीसी दिसले नाहीत. त्यामुळे रेल्वेने असे वाद टाळण्यासाठी प्रत्येक डब्यात टीसीची सुरुवातीपासून शेवटपर्यंत नियुक्ती करावी.

– सागर शिंदे, प्रवासी

जनरल तिकीटधारकांनी आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांच्या जागेवर बसू नये. आरक्षित जागांवर कोणी जनरल तिकीटधारक प्रवासी बसला असल्यास त्याने तत्काळ तिकीट कंडक्टर यांच्याशी संपर्क साधावा, तिकीट कंडक्टर आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशाला जागा उपलब्ध करून देतील.

– अजय कुमार, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे, पुणे विभाग

जनरल तिकीटधारकांनी आरक्षित जागेवर बसू नये, त्यासोबतच सीझन, मंथली पासधारकांनी त्यांचे डबे सोडू नयेत. मात्र, सध्या पुणे-मुंबई मार्गावर प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे. त्यांच्यासाठी पुण्याहून मुंबईला जाणार्‍या गाड्यांमध्ये आणि डब्यांमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. किमान 6 रेल्वेगाड्या रोज सकाळी पुण्यातून मुंबईला जायला हव्यात. सध्या मात्र तीनच जातात. या गाड्यांमध्ये रेल्वेने वाढ करावी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news