Railway News : भुसावळ मंडळातील दहा स्थानकांचा होणार विकास

Railway News : भुसावळ मंडळातील दहा स्थानकांचा होणार विकास
Published on
Updated on

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा
अमृत भारत स्टेशन विकास योजनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) यांच्या उपस्थितीत देशभरातील 554 रेल्वे स्टेशन व 1500 रोड ओव्हर ब्रिजचे उद्घाटन तसेच लोकार्पण ऑनलाइन केले जाणार आहे. भुसावळ मंडळातील देवळालीसह दहा रेल्वे स्थानकांचे व 68 ओव्हर ब्रिज, अंडर ब्रिज कामांचा शुभारंभ सोमवारी (दि. 26) होत असून, देवळाली स्थानक (Devali Railway station) नूतनीकरणाचा शुभारंभ सकाळी ११.५५ वाजता रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Minister of State for Railways Raosaheb Danve) यांच्या हस्ते व खासदार हेमंत गोडसेसह (MP Hemant Godse) विविध मान्यवरांच्या उपस्थितीत केला जाणार आहे.

या कार्यक्रमास भुसावळ विभागाच्या डीआरएम इती पांडे, एडीआरएम सुनील कुमार सुमन, अजय कुमार तसेच देवळाली कॅम्प स्टेशन प्रबंधक आर. के. कुठार यांसह रेल्वेच्या भुसावळ मंडळ प्रभागचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय स्थानिक लोकप्रतिनिधी विविध विभागाचे अधिकारी, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य, विविध राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी हे देखील उपस्थित राहणार आहे. (Amrit Bharat Station Development Scheme)

देवळालीत या कामाचा समावेश
देवळाली रेल्वे स्थानकावर स्टेशन प्रबंधक कार्यालय, पार्सल ऑफिस, हेल्थ ऑफिस, टीसी ऑफिस, एमसीओ ऑफिस यांचे पूर्णपणे नूतनीकरण केले जाणार आहे. नवीन कोच डिस्प्ले बोर्ड बसवण्याचे काम सुरू आहे. लवकरच संपूर्ण रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. सध्याच्या एमसीओ ऑफिसजवळ नवीन फुट ओव्हर ब्रिज निर्मिती केली जाणार आहे. दोन्ही प्लॅटफॉर्मवर लिफ्टची व्यवस्था करण्यात येऊन सर्व विजेच्या तारा भूमिगत करून या स्थानकाचे ऐतिहासिक महत्व कायम कसे राहील याबाबत उपाययोजना केल्या जाणार आहेत. रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर कामाची पूर्तता करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कामे सुरू आहेत. (Amrit Bharat Station Development Scheme)

असे आहे नूतनीकरण
पुनर्विकासाअंतर्गत स्टेशनच्या दर्शनी भागात सुधारणा, लँडस्केपिंगसह परिसर क्षेत्राचा विकास, लिफ्ट, पादचारी पूल, सुधारित सुविधांसह विद्यमान टॉयलेट ब्लॉक्सचे नूतनीकरण, प्रत्येक प्लॅटफॉर्मवर आधुनिक पिण्याच्या पाण्याची सोय, स्टेशनवर प्रकाश आणि वायुविजन सुधारणे, दिव्यांगांसाठी फ्लोरिंगसह सुधारित स्टेशन सरफेसिंग, नवीन सुधारित ट्रेन आणि कोच इंडिकेटर आणि साईनेज, विद्यमान बुकिंग कार्यालय, वेटिंग रूमचे नूतनीकरण आणि कमर्शियल वर्क सेंटरमध्ये फर्निचरची तरतूद, संबंधित स्थानकासाठी अमृत खर्चासह योजना आणि अंदाज तयार केले आहेत. (Amrit Bharat Station Development Scheme)

असे आहे अंदाजपत्रक
संपूर्ण मध्य रेल्वेच्या विकासासाठी रेल्वे बोर्डाकडून 13,539 कोटीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आलेले आहे, भुसावळ विभागातील नऊ स्टेशनसाठी 110.80 कोटी, तर 68 आरयुबीसाठी 297 कोटी असे 407 कोटीचे अर्थ अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आलेली अाहे. त्यात देवळालीसाठी 10.5 कोटी, मुर्तीजापूर 12.96 कोटी, नांदुरा 10.63 कोटी, नांदगाव 10.6 कोटी, पाचोरा 27.67 कोटी, धुळे 9.49 कोटी, लासलगाव 10.5 कोटी, रावेर 9.22 कोटी आणि सावदा 8.51 कोटी.

पुनर्विकास कास केवळ दिखाव्यासाठी – रतन चावला
देवळाली रेल्वे स्थानकाचे नुतनीकरण केवळ शोभेपूर्ते असून, गाड्यांचा थांबा नसल्याने पुनर्विकास केवळ दिखाव्यासाठी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस रतन चावला व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. (Amrit Bharat Station Development Scheme)
देवळाली रेल्वे स्थानकावर कोरोना काळाच्या अगोदर 22 रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात आला होता. मात्र कोरोना काळानंतर त्याची संख्या घटून केवळ बोटावर मोजण्याइतकी राहिली आहे. वास्तविक देवळाली रेल्वे स्थानकाला नाशिक, सिन्नर, इगतपुरी या तालुक्यातील शेकडो गावी व प्रवासी जोडले गेलेले आहेत. तसेच लष्कराचे प्रशिक्षण केंद्र येथे आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी येथे असल्याने देशभरातून सावरकर प्रेमी येथे येत असतात. याबाबत लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला अनेकदा विनंती करून झालेली आहे. मात्र कोणाकडूनही दखल घेतली जात नसल्याने सोमवारच्या कार्यक्रमाप्रसंगी मंत्र्यांना आम्ही विनंतीसह परिस्थिती लक्षात आणून देताना प्रसंगी काळे झेंडे दाखवून लोकशाही मार्गाने आमचा संताप व्यक्त करणार असल्याचे चावला यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news