कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अश्लील चाळे होत असल्याच्या संशयावरून उमा टॉकीज परिसरासह राजारामपुरी पाचवी गल्ली, कसबा बावडा, नागाळा पार्क येथील कॅफेसह लॉजिंगवर निर्भया पथकाने शुक्रवारी छापे टाकले. यावेळी चार प्रेमी युगुलांसह 16 जणांना ताब्यात घेतले. अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, सहायक निरीक्षक मेघा पाटील यांच्या पथकाने कारवाई केल्याने खळबळ माजली आहे. पालकांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांच्यासमोर युवतीसह तरुणांची झाडाझडती घेतली. समज देऊन त्यांची सुटका करण्यात आली. (kolhapur crime)
निर्भया पथकाने सकाळी सात वाजल्यापासून शहरातील बहुतांशी महाविद्यालयांना भेटी देऊन कॉलेज युवती, महाविद्यालय व्यवस्थापनाशी चर्चा केली. प्रेमी युगुलांसह अनैतिक चाळ्यांना आश्रय देणार्या कॅफे, लॉजेस तसेच हॉटेल्सची माहिती मिळताच पथकाने वर्दळीचा परिसर असलेल्या उमा टॉकीजजवळील एस. जे. कॅफेवर छापा टाकून तपासणी केली. कारवाईनंतर परिसरात बघ्यांची तोबा गर्दी झाली होती.
पालकांसमोरच खरडपट्टी!
तपासणीमध्ये चार कॉलेज युवतींसह पाच मुले आढळून आली. संबंधितांना ताब्यात घेऊन जुना राजवाडा पोलिस ठाण्यात प्रतिबंध कारवाई करण्यात आल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक देसाई यांनी सांगितले. संबंधितांच्या पालकांना सायंकाळी पोलिस ठाण्यात बोलावून त्यांच्यासमोरच त्यांची खरडपट्टी करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
राजारामपुरी येथील पाचव्या गल्लीतील कॅफेवर गुरुवारी (दि. 3) सहायक निरीक्षक मेघा पाटील यांच्या पथकाने छापा टाकून 7 जणांना ताब्यात घेतले. याशिवाय नागाळा पार्क, कसबा बावडा परिरातही छापेमारी करण्यात आली असून संबंधित व्यावसायिकांच्या मालकांना नोटीस बजाविण्यात आल्याचे सांगण्यात आले. निर्भया पथकाच्या छापेमारीमुळे गैरकृत्याला आश्रय देणार्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
शहरासह परिसरात रोडरोमिओंचा सुळसुळाट झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह कॉलेज युवतीच्या छेडछाडीच्या घटनांचे प्रकार वाढू लागल्याने पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कठोर कारवाईच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार पथकाने शहर, उपनगरांसह जिल्ह्यात कारवाईची मोहिम सुरू केली आहे.
ओळख लपविणार्याची माहिती द्या : अप्पर पोलिस अधीक्षक
अप्पर पोलिस अधीक्षक देसाई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अश्लील चाळ्यांसह अनैतिक घटना टाळण्यासाठी हॉटेल्स, कॅफे चालक-मालक, रिसॉर्ट व्यावसायिकांनी ग्राहक, पर्यटकांच्या ओळखपत्राची सत्यता पडताळून त्यांची खात्री करून घ्यावी. स्वत:ची ओळख लपविण्याचा प्रयत्न करणार्यांची तातडीने संबंधित पोलिस ठाण्यांना माहिती घ्यावी. (kolhapur crime)