वाल्हे : पुढारी वृत्तसेवा : यंदा वाल्हे व परिसरात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम वाया गेला. परतीच्या पावसाच्या आशेवर परिसरातील शेतकर्यांनी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली. परंतु, ती आशाही फोल ठरली. पुरंदर तालुक्याच्या दक्षिण-पूर्व भागात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. रब्बी हंगामातील पिके पाण्याअभावी धोक्यात आल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदील झाला आहे. चाराटंचाईमुळे पशुधन धोक्यात आले आहे. मागील काही दिवसांत अनेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र, पुरंदर तालुक्यात पावसाने खो दिला. अवकाळीच्याही सरी न पडल्याने रब्बी हंगामातील पिकांना पाणी कमी पडू लागले आहे. पिके जळू लागली आहेत. वाल्हे व वाल्हेकडील पूर्व भागातील वाड्या- वस्त्यांवर पावसाळ्यापासूनच टँकरने पाणीपुरवठा होत आहे. पाण्याअभावी शेतकरी अडचणीत सापडला आहे.
चारा छावणी, टँकरच्या मागणीचा जोर
खरीप हंगाम पुरंदर तालुक्यात कोरडा गेला होता. रब्बी हंगामात तरी दिवाळीत पाऊस पडेल, असा आशावाद शेतकरीवर्गाला होता. मात्र, रब्बी हंगामातही पाऊस न पडल्याने जनावरांना चारा, पाणी मिळणे कठीण झाले आहे. शेतकरी इतर ठिकाणांहून जनावरांचा चारा विकत आणून पशुधन टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अगोदरच दुधाचा दर कमी झाल्याने शेतकरीवर्ग आर्थिक संकटात आहे. त्यातच चार्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे चारा छावणीची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच, पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी होऊ लागली आहे.