पुढारी ऑनलाईन डेस्क : R Ashwin Record : टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा 12 जुलैपासून सुरू होत आहे. उभय संघांमध्ये पहिला दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. अशाप्रकारे या मालिकेद्वारे दोन्ही संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या पर्वाची सुरुवात करतील. दरम्यान, भारताचा फिरकी गोलंदाज आर. अश्विन या मालिकेत मोठी कामगिरी करू शकतो. तो आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 700 विकेट्स घेण्याच्या उंबरठ्यावर पोहचला असून त्याच्या कारगिरीकडे चाहत्यांसह माजी दिग्गज क्रिकेटपटूंचे लक्ष लागले आहे.
अश्विनने 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. जवळपास दीड दशकाच्या कारकिर्दीत, त्याने सर्व फॉरमॅटमध्ये 270 सामने खेळले असून 25.93 च्या सरासरीने आणि 3.37 च्या इकॉनॉमी रेटने 697 बळी घेतले आहेत. यादरम्यान 59 धावांत 7 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे, जी त्याने कसोटी सामन्यात नोंदवली. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 32 वेळा किमान 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यात 3 विकेट घेताच अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 700 बळींचा आकडा गाठेल. यासह हा आकडा गाठणारा तो जगातील 16 वा तर अनिल कुंबळे (953) आणि हरभजन सिंग (707) यांच्यानंतरचा भारताचा तिसरा खेळाडू ठरेल.
अश्विनने विंडीजविरुद्ध 11 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 21.85 च्या सरासरीने 60 विकेट्स घेतल्या आहेत. कॅरेबियन संघाविरुद्ध भारताकडून सर्वाधिक बळी घेणा-या गोलंदांच्या यादीत तो सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. त्याला बिशनसिंग बेदी (62), चंद्रशेखर (65) आणि वेंकटराघवन (68) यांना मागे टाकण्याची संधी आहे. जर त्याने असे केले तर तो वेस्ट इंडिजविरुद्ध तिसरा सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनेल.
अश्विनला सर्वात जलद 700 आंतरराष्ट्रीय विकेट घेण्याची संधी आहे. त्याने आतापर्यंत 350 डावात गोलंदाजी केली आहे. भारताकडून कुंबळेने 389 तर हरभजनने 435 डावांत 700 विकेट्सचा आकडा गाठला होता. अश्विनने आगामी कसोटी मालिकेत 11 विकेट्स घेतल्यास तो हरभजनला (707) मागे टाकेल.