पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्ष तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) मतदारांना अजब आश्वासन दिले आहे. पक्षाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री चंद्रबाबु नायडू यांनी राज्यात सत्तेवर आल्यास कमी किमतीत चांगल्या दर्जाची दारू देणार, असल्याची ग्वाही दिली आहे. कुप्पम येथील सभेत ते बाेलत हाेते.
या वेळी चंद्राबाबू नायडू म्हणाले की, ४० दिवसानंतर राज्यात तेलगू देसम पार्टीचे राज्यात सरकार स्थापन होईल. यानंतर आम्ही केवळ दर्जेदार दारू उपलब्ध करून देणार नाही तर किंमती कमी करण्याची जबाबदारी घेऊ. या वेळी त्यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी आणि त्यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षावर राज्यात दारूबंदी करण्याच्या २०१९ मधील निवडणुकीतील आश्वासनावर माघार घेतल्याबद्दल टीकाही केली.
आकाशाला भिडणाऱ्या दारूच्या किमतींसह सर्वच वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. जेव्हा मी दारूचा उल्लेख करतो तेव्हा आमचे धाकटे भाऊ आनंदात राहतात. त्यांना दारूचे भाव कमी करायचे आहेत. जगन मोहन रेड्डी यांनीच दारुच्या एका बाटलीची किंमत 60 रुपयांवरून 200 रुपये केली आणि 100 रुपये खिशात टाकले, असा आरोपही त्यांनी केला.
आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेस पक्षाचे सरकार 2019-20 मधील 17,000 कोटी रुपयांच्या तुलनेत 2022-23 मध्ये उत्पादन शुल्क महसूलाद्वारे (कस्टम ड्युटी) सुमारे 24,000 कोटी रुपये उभारणार असल्याची माहिती आहे. विशेषतः आंध्र प्रदेशात सरकारी मालकीच्या दुकानांतून दारू विक्री केली जाते. चंद्राबाबू नायडू यांनी वायएसआर काँग्रेस पक्षाच्या सरकारवर निकृष्ट दर्जाची दारू पुरवल्याचा आणि महागाईच्या किमतीतून हजारो कोटी रुपयांचा नफा कमावल्याचा आरोप केला.
जनता सेना पक्ष (JSP) प्रमुख आणि अभिनेता पवन कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी NDA मध्ये तेलगू देसम पार्टीचे मित्र पक्ष आहेत. यावेळी त्यांनी आंध्र प्रदेशातील सत्ताधारी सरकारवरही हल्लाबोल केला. वायएसआर काँग्रेस पक्षाने पुरविलेल्या दारूचे सेवन करत राहिल्यास लोक आजारी पडतील. जगन मोहन रेड्डी यांनी दारू विक्रीतून 40 हजार कोटी रुपयांची लूट केल्याचा आरोप त्यांनी केला. दारू खरेदीसाठी डिजिटल पेमेंट का स्वीकारले जात नाही, असा सवालही त्यांनी केला. पैसा कुठे जात आहे? एकूण विकल्या जाणाऱ्या दारूपैकी सुमारे 74 टक्के दारूचा पुरवठा फक्त 16 कंपन्यांकडून होतो, असा दावाही त्यांनी केला.
भाजप लोकसभेच्या सहा आणि विधानसभेच्या १० जागांवर निवडणूक लढवणार आहे. त्याचबरोबर टीडीपीला लोकसभेच्या 17 आणि विधानसभेच्या 144 जागा देण्यात आल्या आहेत. जनसेना पक्षाला लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या २१ जागा देण्यात आल्या आहेत.